पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दिड ते दोन महिन्यात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कधी गॅस, कधी कांदे, कधी डाळींमुळे महागाईने आधीच हवालदील होणारा सामान्य ग्राहक सध्या टोमॅटोमुळे मेटाकुटीला आला आहे. त्यातच देशभरात टोमॅटोच्या किमती १६० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्यामुळे उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील एका भाजी विक्रेत्याने त्याच्या स्टॉलचे संरक्षण करण्यासाठी चक्क बाउन्सर ठेवले होते. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील स्मार्टफोन दुकान मालकाने ग्राहकांना मोबाइल फोनसह टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. एकीकडे ग्राहकांची ही अवस्था असताना दुसरीकडे महाराष्ट्रात एका शेतकऱ्याने टोमॅटोच्या विक्रीमुळे कोट्यवधींचा नफा कमावल्याचे बोलले जात आहे. परंतु त्यातच आता एका शेतकऱ्याचे चक्क टोमॅटोच चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
२० कॅरेट चक्क चोरीला
सध्या टोमॅटोच्या दरांमुळे सामान्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असला, तरी दुसरीकडे बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळत असल्याचीही भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे टोमॅटो ही जणू काही मौल्यवान गोष्ट बनली आहे आणि मौल्यवान गोष्टीची चोरी होतेच, तसेच टोमॅटोची देखील चोरी झाली आहे. या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील एका शेतकऱ्याचे विक्रीला नेण्यासाठी तोडून ठेवलेले टोमॅटोचे २० कॅरेट चक्क चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसात धाव
शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील शेतकरी अरुण ढोमे यांनी टोमॅटो तोडून विकण्यासाठी कॅरेटमध्ये ठेवले होते. सुमारे ४० हजार रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ढोमे यांनी मोठ्या हिमतीने टोमॅटो पिकाची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी तोडणीलादेखील पैसे लावले. त्यानंतर त्यांनी बाजारात विकण्यासाठी नेण्यासाठी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ढोमे हे गाडी आणि कॅरेट व्यवस्थितरित्या लावल्याची खात्री करून झोपले होते. कारण त्यांनाही टोमॅटो बाजारात विक्रीसाठी न्यायचे होते. परंतु सकाळी उठून पाहतात तर टोमॅटो गायब झाले होते. हा प्रकार बघून त्यांना धक्का बसला. या प्रकाराची त्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी शिरूर तालुक्यातील बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे, शरदवाडी आदि परिसरातून शेतकऱ्यांच्या कृषी अवजारे व अन्य साहित्य चोरी अशा स्वरूपाच्या अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहे. पण आता टोमॅटो चोरीला गेल्याने या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.