पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ३५ वर्षीय बस चालकाने शालेय विद्यार्थिनीचा बलात्कार केल्याची घटना घडली असून या बस चालकाला अटक करण्यात आली आहे. कोंडवा पोलिसांनी रविवारी याप्रकरणी अटकेची कारवाई केली. बस चालकाला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याने १५ वर्षांच्या मुलीशी गोड बोलून, तिच्याशी मैत्री करत तिच्यावर बलात्कार केला होता.
या प्रकरणाचा खुलासाही धक्कादायक पद्धतीने झाला. १६ जुलै रोजी १५ वर्षांची विद्यार्थीनी आरोपी स्कूल बस चालकाला भेटून रात्री उशिरा घरी परतली होती. त्यावेळी या मुलीच्या आईला संशय आला. त्यानंतर या प्रकरणाचा हळूहळू उलगडा झाला. आईने मुलीची चौकशी केल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण समोर आले. अखेर पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आणि मग पुढील कारवाई केली गेली.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी स्कूल बस ड्रायव्हरला रविवारी अटक केली होती. पण मुलीच्या संमतीने संबंध ठेवल्याचा दावा आरोपी स्कूल बस चालकाने केला होता. बलात्कार प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या संमतीचा प्रश्नत येत नसल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च ते जुलै दरम्यान स्कूलबस चालकाने तीन वेळा या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुलीसोबत मैत्री करत स्कूल बस चालकानं तिच्याशी संबंध वाढवले.
कलम ३७६ नुसार बलात्काराच्या गु्न्ह्याखाली या स्कूल बस चालकावर आता खटला चालवला जाणार आहे. पोलिसांनी रविवारीच या आरोपीला कोर्टासमोर हजर केलं असून, २५ जुलैपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनीच्या मैत्रिणीच्या घरात त्यांनी एकमेकांशी संबंध ठेवले होते. पीडित मुलीच्या आईने मुलीची चौकशी केल्यानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आलं. यानंतर तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेत स्कूल बस ड्रायव्हरला ताब्यात घेतलंय. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.
Pune Crime School Bus Driver Rape on SSC Girl Student