पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमरावती येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) भरत गायकवाड यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची बाब समोर आली आहे. गायकवाड यांनी सर्वप्रथम पत्नीचा खून करुन पुतण्याला गोळी मारली. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. बाणेर परिसरात घडलेल्या या घटनेने पोलिस दलासह पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
आज, सोमवार (२४ जुलै) पहाटे ४ वाजता गायकवाड यांनी सर्वप्रथम पत्नीचा खून केला. त्यानंतर पुतण्यावर गोळी झाडली. या दोघांच्या खुनानंतर स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. मोनी गायकवाड (४४) ही भरत गायकवाड यांची पत्नी आहे तर दीपक गायकवाड (३५) हा त्यांचा पुतण्या आहे.
या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गायकवाड यांचे कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला होते. तर भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. भरत गायकवाड हे सुटीवर पुण्यात आले होते. त्याचवेळी हा प्रकार घडला आहे. या हत्येमागील कारण अद्याप पुढे आलेले नाही. पत्नीचा खून व पुतण्यावर गोळी मारुन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्यामागे काय कारण आहे याचा पोलिस तपास करत आहेत.