पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतासह संपूर्ण जगात दहशतवादाचे जाळे पसरविणाऱ्या इसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेमध्ये भरती करण्याची जबाबदारी ज्याच्यावर होती त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एनआयएने ही कारवाई केली असून संपूर्ण देशात या कारवाईने खळबळ माजली आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुण्यात लोक शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी जातात. त्यामुळे याठिकाणी दहशतवादाची पाळंमुळं रोवण्याची संधी इसीसने साधली. विशेष म्हणजे ज्याला अटक करण्यात आली आहे तो डॉक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींचा इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS), Daish/Islamic State in Khorasan सारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्या इसीसच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता, असे स्पष्ट झाले आहे.
इसीस संघटनेच्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या या इसमाचे नाव अदनाली सरकार आहे आणि तो डॉक्टर आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून तो पुण्यात राहायचा आणि त्याच्यावर दहशतवादी संघटनेतील भरतीची जबाबदारी होती. आयसिसचे मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवणं ही याची मुख्य जबाबदारी होती. महाराष्ट्र हे मॉडेल पोहोचवण्यात डॉक्टर अदनाली याचा मोठा हात होता. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतून तीन आणि ठाण्यातून एका जणाला अटक केलेली आहे.
कागदपत्रे जप्त
डॉ. अदनाली सरकार याच्या घरातून इसीससंदर्भात अनेक कागदपत्रे सापडली असून काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देखील सापडले आहेत. तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये समाविष्ट करून त्यांचे ब्रेन स्टॉर्मिंग करण्याचा सगळा प्रकार डॉक्टर अदनाली करत होता.