इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यात पतीने पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येनंतर पतीने पत्नीचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर तो स्वत.च पोलिस स्टेशनमध्ये गेला व त्याने सरेंडर केले. खराडी परिसरात बुधवारी पहाटे ही घटना घडली. प्रॅापर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पतीने हे व्हिडिओतही कथन केले आहे.
या घटनेतील आरोपी शिवदास गिते हा मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालयात टंकलेखक आहे. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन दोघांत वाद सुरु होता. ज्योती आणि तिचा पती शिवदास मध्ये बुधवारी पहाटे पुन्हा वाद झाला. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. शिवदासने केलेल्या या वारानंतर पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शिवदासने व्हिडिओ बनवला.
या घटनेचा पुण्यातील चंदननगर पोलिस तपास करीत आहे. या घटनेत खून व व्हिडिओ बनवल्याचा क्रूर प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे.