पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहराची प्रतिमा मलीन करणारी घटना घडली आहे. येथील दोन सख्ख्या भावांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार, या भावांनी पीडितेवर सलग पंधरा दिवस अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे येथे एकामागोमाग एक भयंकर घटनांची अक्षरश: मालिका सुरू आहे. भावी सनदी अधिकारी होणाऱ्या युवतीची हत्या असो वा एकतर्फी प्रेमातून एका युवतीवर पाठलाग करून झालेला हल्ला असो. पुणे अशा घटनांनी हादरलेले आहे. अशात आता या नव्या प्रकरणाची भर पडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी नराधम इरफान शेख आणि आयुब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
मुलीची आई मंगळवारी रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आली होती. यावेळी मुलगी अभ्यास करत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब दिसला. तर मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिल्यावर खोलीत इरफान दिसला. मुलीच्या आईला पाहून दोघांनीही पळ काढला. दरम्यान, याच घटनेच्या विरोधात उद्या उरळी कांचनमध्ये बंदची हाक दिली आहे.
पालकांच्या हत्येची दिली धमकी
दोन्ही भावांनी सलग पंधरा दिवस पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिच्या पालकांना कोयत्याने मारून टाकण्याची धमकी दिली होती. परिणामत: या मुलीने हा संपूर्ण प्रकार सांगण्याची हिंमत दाखविली नाही, अशी माहिती आहे.