पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कायदे कितीही कठोर झाले तरीही विकृतीला आळा घालणे अशक्य आहे, हेच यातून सिद्ध होते. पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या शहरात तर अश्या घटनांची मालिकाच बघायला मिळत आहे. अलीकडेच तब्बल तीन वर्षांनंतर एक प्रकरण उघडकीस आले आहे.
पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी तिघांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केले होते. २०१८-२०१९ मध्ये घडलेल्या या घटनेची अल्पवयीन मुलीने आज तक्रार केली असून पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली आहे. इतर दोघे फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पीडित मुलगी सातव्या वर्गात असताना म्हणजे जवळपास १३ वर्षांची असताना ही घटना घडली होती.
घराशेजारी राहणाऱ्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. तीन वर्षांपूर्वी एक दिवस ही मुलगी घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी तिला एक वस्तू संबंधित घरात नेऊन देण्यास कुटुंबातील लोकांनी सांगितले. मुलीने त्या घरात कुणी आहे का म्हणून आवाज देताच तिघांनीही तिला घरात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्रास देण्याची धमकी
अत्याचार केल्यानंतर घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर कुटुंबाला त्रास देऊ, अशी धमकी आरोपींनी मुलीला दिली होती. त्यामुळे ती तीन वर्षे शांत बसली. याची वाच्यता तिने कुणाकडेही केली नाही.
असा झाला खुलासा
शाळेमध्ये समुपदेशन वर्ग सुरू असताना मुलीला अचानक आपल्यावर झालेल्या अत्याचाराला आता वाचा फोडण्याची वेळ आली आहे, असे वाटले. त्यामुळे तिने घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली.
Pune Crime Minor Girl Gang Rape School