पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराची ओळखही विद्येचे माहेरघर म्हणून असली तरी सध्या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. गेल्या सहा महिन्यात पुण्यामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. विशेषतः महिनाभरात तर गुन्हेगारी टोळक्यांनी शहरात अक्षरशः हैदोस घातला आहे. त्यात कोयता गँग अग्रेसर आहे. केवळ अंगावर चिखल उडाला या किरकोळ कारणावरून टोळक्याने थेट कोयत्यांनी वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिण्यात आली आहे.
शाब्दिक बाचाबाचीचे हाणामारीत रूपांतर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयता गँगची शहरात मोठी दहशत आहे. किरकोळ कारणांवरून वाद घालून ही गँग कोयते हातात घेऊन वाहनांची तोडफोड करतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. आता या घटनेत फिर्यादी इजाज हा डोणजे येथील त्याच्या घराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला थांबलेला होता. त्याचवेळी सिंहगडाकडून येणाऱ्या दुचाकीमुळे त्याच्या अंगावर चिखल उडाला. त्यातून इजाज याने दुचाकीवरील तरुणांकडे याबाबत विचारणा केली, त्यातून शाब्दिक बाचाबाची व हाणामारी झाली. यावेळी गर्दी जमा होऊन स्थानिकांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला, पण हे तरूण कोयता गँगचे होते. दुसऱ्या दिवशी तोंडाला रुमाल बांधून आणि हातात कोयते घेऊन १० ते १२ जण दुचाकींवरुन आले. मोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करत त्यांनी एका चारचाकी आणि एका मोटारसायकलची तोडफोड केली. त्यामुळे स्थानिक रहिवासी घाबरले.
महिनाभरापुर्वी देखील अशीच घटना
आदल्या दिवशीचे भांडण इजाज विसरला होता, मात्र लगेच दुसऱ्या दिवशी अचानक घडलेल्या या भयानक प्रकारामुळे इजाज व त्याच्या घरातील सर्व सदस्य घाबरले होते. तसेच परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शिवप्रसाद याच्यासह इतर १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून महिन्यातही अशी भयानक घटना घडली होती. वाहनांची तोडफोड करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारासह टोळीतील सहा जणांविरुद्ध पोलिसांनी ही कारवाई केली होती. टोळीने कर्वेनगर आणि तळजाई परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी या टोळीतील चार जणांना अटक होती.आता या गँगचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.