पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधुनिक काळात विभक्त कुटुंब सुखी मानले जाते. परंतु, नवरा आणि बायको दोघेही नोकरी करीत असतील तर एकतर मुलांचे हाल होतात, नाहीतर नवरा-बायकोमध्ये तरी भांडणांचे प्रमाण वाढत जाते. पुण्यातील अशाच एका घटनेने असे काही वळण घेतले की त्याची आता चांगलीच चर्चा रंगतेय.
पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणारा नवरा आपल्याला वेळ देत नाही, याचा राग म्हणून पत्नीने एक उपाय शोधून काढला. पण हा उपाय इतका स्फोटक होता की, त्यामुळे महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पत्नीने पतीच्या ई-मेलवरून त्याच्या कंपनीला मेल टाकला. या मेलमध्ये तिने बॉम्बची धमकी दिली. कंपनीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी महिलेच्या नवऱ्याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. त्यावेळी महिला स्वतः तिथे उपस्थित होती. त्यामुळे तिने शेवटी कबुली दिली.
पती वेळ देत नसल्याच्या रागात कंपनीला मेल केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महिलेविरुद्ध कलम ५०६ (२) आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांनुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या सतत बाहेर राहण्यामुळे वैतागलेली ३२ वर्षीय महिला इतके टोकाचे पाऊल उचलू शकते, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. आता चंदननगर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. महिला कोंढवा येथील एका कोचिंग क्लासमध्य़े इंग्रजीची शिक्षक आहे. अर्थात पतीने अलीकडेच नोकरी सोडली असल्याचे पुढे आले आहे.
घटस्फोट होता होता राहिला
मुळात पती-पत्नीमध्ये दरम्यानच्या काळात खूप वाद वाढलेले होते. दोघांची सतत भांडणे व्हायची. त्यामुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. मात्र सामंजस्य़ाने घेत निर्णय मागे घेतला आणि एकत्र राहू लागले. परंतु, तरीही आयटी कंपनीमध्ये नोकरीला असलेला पती सतत कामाच्या निमित्ताने बाहेर असतो, याचा पत्नीला अक्षरशः वैताग आला होता. त्यानंतर तिने धडा शिकवायचा म्हणून टोकाचे पाऊल उचलले.