पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यात गेल्या महिनाभरापासून एकापेक्षा एक आश्चर्यकारक आणि तितक्याच संतापजनक घटना घडताहेत. कधी येथे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उघडकीस येत आहे तर कधी एकतर्फी प्रेमातून पाठलाग करून तरुणीवर हल्ला करण्यात येत आहे. अशा घटनांची मालिका सुरू असतानाच आता त्यात अजून एका प्रकाराची भर पडली आहे. येथील एका सोसायटीतील सदस्याच्या पत्नीला पॉर्नस्टार ठरवित महिलेशी संबंधित आक्षेपार्ह मेल शंभरहून अधिक व्यक्तींना पाठविण्यात आला आहे. या घटनेने पुण्यात खळबळ माजली आहे.
शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. मागील महिनाभरात येथे विविध घटना घडल्या असून यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दयनीय असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील एका मोठ्या हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका सदस्याची पत्नी पॉर्नस्टारसारखी दिसते, असा मेल सोसायटीच्या १४० सदस्यांना करण्यात आला आहे. कोंढवा भागात असणाऱ्या सोसायटीमध्ये एका महिलेला पॅार्नस्टार म्हणून संबोधन करत विनयभंग करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कोंढवा पोलिसांनी शेखर बाबुलाल धोत्रे या सदस्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या आरोपी शेखर धोत्रे याने ‘याची बायको पोर्न अॅक्ट्रेस सारखी दिसते’, अशी अश्लील भाषा वापरत सोसायटीमधील १४० सदस्यांना मेल पाठवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
धोत्रे यांनी दिली धमकी
आक्षेपार्ह मेल करणाऱ्या धोत्रे यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी उलट फिर्यादीला ‘जे करायचे ते कर’, असे धमकावल्याची माहिती आहे. महिलेबाबत अशा प्रकारचा मेल करणाऱ्या मनोवृत्तीचा धिक्कार नोंदवित महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Pune Crime Housing Society Women Molestation Pornstar
Kondhwa Email