पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा चार दिवसांपूर्वी सांगाडा काय सापडतो, काल-परवा एक अॉटोचालक इंजिनियर तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न काय करतो. या घटनांमुळे पुण्यात मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील तरुणांचा पुण्यात शिक्षण घेण्याकडे कल असतो. मात्र आता पुण्यातील वातावरण मुलींसाठी असुरक्षित झाले की काय, अशी शंका निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वी एका आयटी कंपनीत कम्प्युटर इंजिनिअर असलेली तरुणी रात्री कामावरून घरी परतत होती. घरी जाण्यासाठी तिने रिक्षा केली. डोळे बंद करून रिक्षाचालकावर विश्वास ठेवत ती तरुणी रिक्षात बसली. रात्रीची वेळ होती. काळाकुट्ट अंधार होता आणि त्याचाच फायदा घेत रिक्षाचालकाने सासवड रस्त्यापासून रेल्वे रुळाच्या बाजुने निर्जन स्थळी रिक्षा थांबवली.
तिथे त्याने तरुणीला छेडण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तो तिला फक्त स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यानंतर त्याने तिच्यावर थेट बलात्कार करण्याचाच प्रयत्न केला. या प्रकारामुळे ती घाबरून गेली. रिक्षाचालक तिचा विरोध सहन करूनही अत्याचार करण्याचा प्रयत्न करतच होता. तिथून कसाबसा पळ काढत तरुणीने आपली अब्रू वाचवली. त्यानंतर थेट पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
चोवीस वर्षाचा तरुण
रिक्षाचालक तरुण आहे आणि आपल्यावर काही संकट आले तर तोच मदतीला धावून येईल, अश्या भावनेने तरुणी रिक्षात बसली. मात्र त्यानेच धोका देत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. २४ वर्षाच्या या तरुण रिक्षाचालकाचे नाव अनिकेत असून त्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.