पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –पुण्यासह सातारा, कोल्हापूर भागातही गुप्तपणे दहशतवादी कारवाया सुरू असून काही दहशतवाद्यांना पकडण्यास पोलीस पथकाला यश आले आहे.पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे आणि परिसरातील सुनसान जागी स्फोट करण्यासाठी बॉम्बस्फोट करण्याची सराव चाचणी केल्याचे एटीएसच्या तपासात समोर आलं आहे. दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने कोर्टात दाखल केलेल्या अहवालात नमूद केली आहे.
दोघांना पकडले तिसरा पळाला
सुमारे २० वर्षांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भाच्या सिमेवर अजिंठ्याच्या डोंगरांमध्ये देखील दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात असाच प्रकार घडत असल्याने खळबळ उडाली आहे.दोघा आरोपींना वाहन चोरीच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूर इथे घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत होती.
संशयास्पद हालचाली
विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्या न्यायालयात दोघा दहशतवाद्यांना ५ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली. सध्या महाराष्ट्र एटीएसने याचा तपास हाती घेतला असून दहशतवाद्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याची कलमवाढ करण्यात आली आहे. मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन दहशतवाद्यांना मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले होते. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
कोंढवा परिसरात वास्तव्य
भयानक गोष्ट म्हणजे हे दोघे दहशतवादी आणि त्यांचे साथीदार बनावट नावाने गेल्या दीड वर्षापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. आणखी विशेष म्हणजे एनआयएने मोहम्मद शहनवाज आलम याच्यावर ५ लाख रुपयांचे इनाम देखील जाहीर केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाड्याने राहत असताना घर मालकासोबत त्यांनी करारनामा देखील केलेला नव्हता. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनी खोटी नावे सांगितली. मात्र पोलीस कॉन्स्टेबल्सनी ट्रु कॉलरच्या सहाय्याने फोन लावून पाहिला असता त्यांची वेगळीच नावे फोनवर दिसून आली. त्यानंतर पोलीसांनी ते दोघे रहात असलेल्या कोंढव्यातील घरी जाऊन तपास केला.
नकाशे व साहित्य
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करत असल्याच उघड झाले आहे. त्यांच्याकडे महत्त्वाचे नकाशे आणि इतर साहित्य आढळून आले. दरम्यान या दोन दहशतवाद्यांकडून ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्य त्यासोबतच स्फोटक असलेली चार किलो केमिकल पावडर जप्त करण्यात आली आहे. यात शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचे देखील चौकशीत समोर आले आहे. आता याचा तपास सुरु आहे. मुंबई बॉम्बस्फोटा प्रमाणे पुणे आणि कोल्हापूर सारख्या शहरात त्यांच्या विचार होता की काय या दृष्टीने आता तपास सुरू आहे.