इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे रेल्वे स्थानक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माथेफिरूच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसने नथुराम गोडसेची विषारी विचारधारा ठेचून काढा! असे सांगत आपला संताप व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसने सांगितले की, पुण्यासारख्या सुसंस्कृत, विचारशील शहरात नथुरामी विचारधारेच्या गुंडगिरीला थारा नाही! हिंदुत्वाच्या नावाखाली गुन्हेगारीला खतपाणी घालून काही मंडळी समाजात अराजक माजवत आहेत. ही प्रवृत्ती पुणे शहराला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला घातक आहे.
सुरज शुक्ला नावाच्या एका बिहारी गुन्हेगाराकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणे हा पुणेकरांच्या संवेदनांवर घातलेला घाव आहे. भगवी वस्त्र घालून हिंदू धर्माच्या नावाने द्वेष फैलावणं हे खरं हिंदुत्व नाही ही विकृती आहे, आणि ती आपण सर्वांनी एकत्र येऊन रोखली पाहिजे.
खासदार, आमदार, मंत्री, पालकमंत्री – काय करताय? पुण्याची कायदा-सुव्यवस्था ढासळलेली आहे, बाहेरून आलेल्या गुंडांना शरण घालणारे प्रशासन जनतेच्या रोषाला सामोरे जाईल असा इशारा काँग्रेसने दिला आहे.