पुणे – जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील चांगले असल्याने जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे आजपासून सुरू होत आहेत. यासंबंधीचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात कोरोना आढावा बैठकीनंतर दिले होते. त्यामुळे तब्बल दीड वर्षानंतर कॉलेज आणि विद्यीपीठे अनलॉक होणार आहेत.
पुणे जिल्ह्यात लसीकरणाला चांगली गती देण्यात आली आहे. लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविड संसर्गाचे प्रमाण देखील नियंत्रणात असल्याने महाविद्यालये व विद्यापीठे सुरू होत आहेत. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालय परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. महाविद्यालय व विद्यापीठ व्यवस्थापनाद्वारे कोरोना मार्गदर्शक सूचनांचे कसोशीने पालन केले जाणार आहे. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे.