पुणे – तीन पक्षांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वादांची मालिका काही कमी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. असमन्वय आणि संभ्रम यानेच सरकारला बेजार केले आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात लसीकरणाचा वेग चांगला असून कोरोना संसर्गही कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पुण्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यातील कोरोना आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार ११ ऑक्टोबरपासून महाविद्यालये व विद्यापीठे सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने महाविद्यालये किंवा विद्यापीठे सुरू करण्याचे निर्देशच अद्याप दिले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राचार्य या सर्वांमध्येच मोठ्या गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, काही महाविद्यालये पुण्यात सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.