पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत दिले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.
पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा, प्रस्तावित नवीन कामांचा, अपघातप्रवण ठिकाणी करावयाच्या उपाययोजना आदींबाबत माहिती पालकमंत्री यांनी जाणून घेतली. जुना पुणे मुंबई रस्त्याचा विकास, प्रस्तावित कात्रज कोंढवा रस्ता, गंगाधाम चौक येथे उड्डाणपूल, खराडी मधील पूल व रस्ते विकास, बालभारती पौड फाटा प्रस्तावित रस्ता तसेच शिवणे खराडी रस्ता याबाबत माहिती घेऊन या प्रकल्पांमधील अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
शहरातील ६ पॅकेजेसमध्ये १०६ रस्ते दुरुस्तीची सुमारे ३३० कोटी रुपयांची कामे सुरू आहे. याव्यतिरिक्त पॅकेजेसमध्ये समाविष्ट नसलेल्या रस्त्यांवर विविध यंत्रणांकडून सुरू असलेल्या खोदाईबाबत कालमर्यादा घालून त्यानुसार रस्ते दुरुस्तीचे नियोजन करावे. रस्त्यांच्या दुरुस्ती, खोदाईबाबत त्या भागातील नागरिकांना माहिती होण्यासाठी लोकप्रतिनिधींना माहिती द्यावी, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामांची माहिती दिली, पुणे शहरात नव्याने समाविष्ट २३ गावातील २७३ कि.मी. रस्त्यांचा महानगरपालिका हद्दीत समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत ९४४ कि.मी. डांबरी, सिमेंटचे २१० कि.मी. तसेच अन्य रस्ते मिळून एकूण १ हजार ४०० कि.मी. चे रस्ते आहेत. त्यादृष्टीने शहरात रस्ते दुरुस्तीचे नियोजन करण्यात येत आहे. रस्त्यांचे अपूर्ण कामे पूर्ण करुन मिसींग लिंक जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अपघात प्रवण ठिकाणांची माहिती वाहतूक विभागाने दिली असून त्यानुसार मनपा आणि वाहतूक विभागाच्या समन्वयाने उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबिल ओढा आणि सिंहगड रोड वरील नाला कल्व्हर्टमुळे पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहतूक विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.पाटील यांनी वाहतूक पोलीस विभागाला दिले.
https://twitter.com/ChDadaPatil/status/1640369060000169986?s=20
पुणे मेट्रोच्या प्रकल्पांना गती देण्याचे दिले निर्देश
पुणे शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन सुरू असलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत असे निर्देश दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, विनोद अग्रवाल, महामेट्रो कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे, प्रमोद आचार्य आदी उपस्थित होते.
यावेळी सद्यस्थितीत मेट्रो सुरू असलेल्या पिंपरी चिंचवड मनपा स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ ते गरवारे स्थानकांदरम्यानच्या रोजच्या प्रवाशी वाहतुकीबाबत तसेच लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट, गरवारे कॉलेज ते सिव्हील कोर्ट आणि सिव्हील कोर्ट ते रुबी हॉल क्लिनीक स्थानकांमुळे प्रवासी संख्येत वाढीचा अंदाज याबाबत श्री.पाटील यांनी माहिती जाणून घेतली. मेट्रोच्या या लवकरच सुरू होणाऱ्या सुमारे १२ कि.मी. च्या लांबीमुळे नागरिकांचा प्रवासाचा वाचणारा वेळ आणि खर्च आदी फायदे लोकांना पटवून देण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रचार- प्रसिद्धी करावी, असे निर्देश त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठविलेल्या पीसीएमसी ते निगडी या ४.४१ कि.मी.च्या आणि स्वारगेट ते कात्रज या ५.५ कि.मी.च्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित तसेच अन्य अधिकाऱ्यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत सादरीकरण करुन माहिती दिली.
https://twitter.com/ChDadaPatil/status/1640365376218316800?s=20
Pune City Traffic Problem Solutions Various Projects