पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. पुणेकर ओला, उबेर रिक्षाला प्राधान्य देतात. आता मात्र पुण्यातील ओला, उबेर रिक्षा बंद होणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर लोकप्रिय झालेल्या ओला आणि उबेर या रिक्षा बंद होणार आहेत.
पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतलेल्या एका निर्णयामुळे या रिक्षा बंद होणार आहे. पुणे शहरात काही ठिकाणी प्रिपेड रिक्षा सेवा सुरु झाली आहे. परंतु ती सर्वत्र नाही. दुसरीकडे ओला, उबेर रिक्षा सेवा सर्वत्र होती. आता ती बंद होणार असल्याने पुणेकरांना पर्यायी वाहतूक मार्ग शोधावा लागणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवडीमधील सुमारे ४० हजार रिक्षांनी ओला, उबेर या कंपन्यांशी करार केला होता. मोटार वाहन मार्गदर्शक सूचना- २०२०’ नुसार ओला, उबेरसह चार कंपन्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही. प्रामुख्याने त्यात मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे यांचा समावेश आहे. यामुळे या चार कंपन्यांना पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने परवाना नाकारला आहे.
चारचाकी, तीनचाकी वाहनांमधून ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या ओला, उबरसह इतर कंपन्यांना ‘ऍग्रीगेटर’ परवान्यासाठी सहा मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली होती. दरम्यान, २० एप्रिलपर्यंत ‘ऍग्रीगेटर’ परवान्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेण्याचे आदेश राज्य सरकाराला दिले होते. त्यानुसार पुण्यासह राज्यातील विविध शहरांत ऑनलाइन प्रवासी सेवा देण्यासाठी आणि ‘ऍग्रीगेटर’ परवान्यासाठी ओला, उबरसह इतर कंपन्यांनी अर्ज केले होते.
पुणे ‘आरटीओ’कडे ओला, उबेर, रॅपीडोसह शहरातील एका कंपनीने हे अर्ज केले होते. यामध्ये ओला व उबरने तीन चाकी व चारचाकीसाठी अर्ज केला असून इतर कंपन्यांनी तीन चाकीसाठी अर्ज केले होते. त्यामध्ये ओला, उबेरच्या हलक्या कारद्वारे प्रवासी सेवेला परवाना देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. तर, रिक्षा सेवेसाठीच्या चारही अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे ओला, उबेरकडून शहरात सध्या दिली जाणारी प्रवासी सेवा बंद करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी सेवा उपलब्ध करून घ्यावी लागणार आहे.
Pune City Ola Uber Auto Rikshaw Service Stop