पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभर पावसाचा जोर वाढत असतानाच पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे येथे डेंग्यु आणि चिकुनगुनियाने थैमान घातले असून सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संपूर्ण राज्यात पावसाचा तडाखा दिसून येत आहे. कुठे दरड कोसहून जीव जाताहेत तर कुठे पूरजन्य स्थितीने सामान्यांचा संपर्क तुटला आहे. अशात आरोग्याच्या समस्यादेखील वाढल्या आहेत. कॉलरा, डोळे येण्याची साथ सुरू आहे. पुणे येथे डेंग्यु आणि चिकुनगुनियाने नागरिकांना त्रस्त केले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड काही दिवसांपासून डेंग्यूची साथ वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे महापालिका हद्दीत २४ जुलैपर्यंत डेंग्यूचे ३३ पॉझिटिव्ह आणि ६२१ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाशी संबंधित रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी सध्या महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. प्राप्त आकडेवारीनुसार, महापालिकेच्या हद्दीत २४ जुलैपर्यंत डेंग्यूचे ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ६२१ संशयित रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.
परिसरात स्वच्छता ठेवा
अनेकदा डेंग्यूचा संसर्ग होऊनही सौम्य लक्षणे अथवा अजिबात लक्षणे दिसून येत नाही. संसर्ग झाल्यानंतर ती ४ ते १० दिवसांत लक्षणे दिसून येतात. प्रमुख लक्षणांमध्ये उच्च ताप (१०४ फॅरनहिट), तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, स्नायू व सांधेदुखी, चक्कर, मळमळ, ग्रंथींना सूज, त्वचेवर चट्टे यांचा समावेश आहे. यापासून बचावण्यासाठी डेंग्यूचा डास दिवसा सक्रिय असल्याने दिवसभर काळजी घ्यावी, परिसरात डासप्रतिबंधक औषधांचा वापर करा तसेच परिसरात स्वच्छ ठेवावा, डास घरात येऊ नयेत यासाठी घराच्या खिडक्यांना जाळी बसवून घ्यावी, शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे परिधान करावेत, आदी सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत.