इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : एकेकाळी राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख होती, अलीकडच्या काळात औद्योगिक क्षेत्रातही पुण्याने चांगली प्रगती केली आहे, विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर वास्तविक पाहता शांततेचेही माहेरघर मानले जाते, परंतु गेल्या वर्षभरात विशेषतः सहा ते आठ महिन्यांमध्ये पुणे शहरात प्रचंड प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे, तरुणींवर हल्ले, गाड्यांची जाळपोळ, दरोडे, बलात्कार चोऱ्या, हाणामाऱ्या अशा घटना सर्रासपणे घडत आहेत, त्यामुळे पोलिसांचे काम वाढलेले दिसून येते, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यातच आता विजय ढुमे हत्याकांड प्रकरण ताजे असताना आता दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठ येथे घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
एका तरुणाच्या डोक्याला बसला जबर मार
एखाद्या घटनेत दोन गटांमध्ये हाणामारी किंवा हल्ला झाला तर ते प्रकरण मिटले असे वाटत असताना पुन्हा दोन ते चार महिने किंवा दोन ते तीन वर्षांनी तो जुनावाद पुन्हा उफाळून येतो, येथे देखील असाच प्रकार घडला. जुन्या वादातूनच ही घटना घडली आहे. कारण एका टोळक्याने नजर ठेवून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला आहे. बिबेवाडी आणि धनकवडी भागात राहणारे २ तरुण पुण्यातील नाना पेठेतील नातेवाईकांकडे आले होते. या दोन्ही तरुणांचे याआधी नाना पेठेतील काही तरुणांशी एकमेकांकडे बघण्यावरुन दीड महिन्यापूर्वी वाद झाला होता. आज हे दोघेही या भागात येत असल्याची माहिती संबंधित तरुणांना मिळाली. त्यानी या दोघा तरुणांवर हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला आहे. सुमारे १० जणांच्या टोळक्याने या तरुणांवर प्राणघातक हल्ला केला आहे. हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला आहे.
या हल्ल्यात यातील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या गंभीर जखमी तरुणाला ससून रुग्णालयात दाखल केले आहे. अनिकेत दूधभाते (३०) आणि निखिल आखाडे (२७) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर संशयित आरोपी यांची नावे रामजी गुजर, आयुष बिडकर, पैलवान आणि यश असे असल्याचे कळाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. मात्र असे प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होते त्यामुळे नागरिकांनी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
pune city crime news