पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक दिवसांपासून 5G प्लस संदर्भातल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. सदर सेवा हीकधी सुरू होणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पुण्यातील लोहगाव विमानतळावर गुरुवार, दि. १७ रोजी या 5G प्लस सेवेला सुरुवात झाली असून ही सेवा देणारे देशातील पहिले विमानतळ, अशी पुणे विमानतळाची नोंद झाली.
पुण्यात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना आता विमानतळाच्या टर्मिनलवर हायस्पीड 5G प्लस सेवा मिळणार आहे. आगमन आणि प्रस्थान टर्मिनल्स, लाउंज, बोर्डिंग गेट्स, मायग्रेशन आणि इमिग्रेशन काउंटर, सुरक्षा क्षेत्रे, बॅगेज क्लेम बेल्ट्स, पार्किंग एरिया या ठिकाणी प्रवासी त्यांच्या मोबाईलवर जलद गतीच्या सेवेचा अनुभव घेणार आहेत.
5G स्मार्ट फोन असलेले सर्व ग्राहक त्यांच्या चालू डेटा प्लॅनवर या हाय स्पीड 5G प्लसचा आनंद घेऊ शकतात. सध्याचे या कंपनीचे 4G सिम हे 5G सक्षम असल्यामुळे सीम बदलण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. 5G इंटरनेट सेवेमुळे सर्वत्र मोठा फायदा होणार आहे.
भारतामध्ये रिलायन्स जीओ आणि एअरटेल यांसारख्या टेलिकॉम कंपन्या 5G इंटरनेट सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सुरुवातीला भारतामधील प्रमुख १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार असून यांत राज्यातील दोन प्रमुख शहर म्हणजेच मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर 5G प्लस सेवा सुरू केली आहे.
भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याची घोषणा यापूर्वी भारती एअरटेलने केली होती, कंपनीकडून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, एअरटेलने यापूर्वी देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर ५ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये, दिल्ली, बंगळुरू, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर, वाराणसी, पानीपत, आणि गुरुग्राम विमानतळावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
१ ऑक्टोबर २०२२ पासून भारतात एअरटेल 5जी लाँच होत आहे. भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. कंपनीने आठ शहरांत ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. एअरटेलची मार्च २०२३ पर्यंत अनेक शहरांमध्ये आणि २०२४ पर्यंत संपूर्ण भारतात 5G सेवा सुरू करण्याची योजना आहे.
Pune City 5G Plus Service Launch Network
Mobile Connectivity