पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील येरवडा येथील शास्त्री बंगल्याजवळ गुरुवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून ७ मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील एका निर्माणाधीन इमारतीत तळघरात रात्री उशिरा काम सुरू होते. त्यादरम्यान पार्किंगमध्ये अचानक लोखंडी अवजड स्लॅब कोसळला.
पोलिस आयुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे म्हणाले की, इमारतीत लोखंडी स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. स्लॅबसाठी १६ एमएमची लोखंडी सळ्यांची वजनदार जाळी तयार करण्यात आली होती. जाळीच्या सहाय्याने उभे राहून मजूर काम करत होते. त्याचदरम्यान अचानक लोखंडी महाकाय जाळी मजुरांवर कोसळली. जाळीच्या खाली दबलेल्या अनेक मजुरांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्या होत्या. दुर्घटनेची माहिती पोलिस आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली. बचावकार्य करणारे पथक घटनास्थळी पोहेचले. जाळीखाली दबलेल्या मजुरांना कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत जीव गेलेल्या आणि जखमी झालेल्या मजुरांची ओळख अद्याप पटलेली नाही. हे सर्व मजूर बिहारचे असल्याचे बोलले जात आहे. सावधगिरीच्या उपाययोजना नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले, की या साइटवर २४ तास काम सुरू होते. त्यामुळे हे मजूर किती तासांपासून काम करत होते याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. ते कदाचित थकले असतील, त्यामुळे दुर्घटना घडली असेल. येथील इतर मजुरांनी सांगितले, की ते बिहार येथील रहिवासी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पुण्यात निर्माणाधीन इमारतीत झालेल्या दुर्घटनेमुळे मला दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी झालेले मजूर लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.