पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी तब्बल ९० कोटींना गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले आहेत. राज्यात एखाद्या बिल्डरवर होत असलेली ही मोठी कारवाई आहे.
डीएसकेंनी स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक व अन्य काही बँकांची मिळून तब्बल ५९० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. डी. एस. के. यांच्या कुटुंबातील काही सदस्यही त्यांच्या कंपनीत संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेऊन सदनिकेचा ताबा दिला नाही, म्हणून डीएसके यांच्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सदनिकांच्या मालकीहक्क कायद्यानुसार (मोफा) गुन्हा दाखल करण्यात आला होता. ८० च्या दशकात डीएसकेंनी बांधकाम क्षेत्रात उडी घेतली आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही. त्यांचे कार्यक्षेत्र हे बांधकामासह कार डीलरशीप, प्रशिक्षण संस्था, गुंतवणूक, इन्फोटेक असे होते. यात त्यांनी गुंतवणूक करून तिथेही स्वतःचे व्यवसाय उभे केले होते.
परंतु शेकडो ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद यांच्यासह अनेकांना मार्च २०१९ मध्ये अटक झाली होती. हेमंती कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२१मध्ये जामीन मंजूर केला होता, मात्र, डीएसके तुरुंगातच आहेत. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.
सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन स्वतंत्र गुन्हे असून, यापैकी पहिला गुन्हा हा स्टेट बँकेने १ जुलै २०२० रोजी दिलेल्या लेखी पत्राच्या आधारे दाखल करण्यात आला आहे. यानुसार, स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, विजया बँक यांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला एकूण ६५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.
विशेष म्हणजे यापैकी ४३३ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. तर दुसऱ्या प्रकरणी सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने १ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या लेखी पत्राच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा डी. एस. कुलकर्णी यांच्या समूहाची उपकंपनी असलेल्या डी. एस. के. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लि. या कंपनीविरोधात दाखल करण्यात आला आहे. या कंपनीने अंदाजे १५६ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. डिझायनिंग, गेमिंग, ॲनिमेशन आदींचे प्रशिक्षण देणारी ही कंपनी होती.
सेंट्रल बँकेने केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये धक्कादायक माहिती बँकेच्या हाती आली. कंपनीला ज्या कारणांसाठी कर्ज दिले होते, त्याऐवजी कंपनीने कर्जापोटी प्राप्त पैसे मुख्य कंपनीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरल्याचे दिसून आले. कंपनीच्या महसुलापैकी ६० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केल्याचे कंपनीने ताळेबंदात नमूद केले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात नोंदी दिसून आल्या नाहीत. डी. एस. के. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लि. कंपनीने सेन्ट्रल बँकेकडून विस्तारासाठी १०८ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्ज २००८ मध्ये घेतले होते. मात्र, या कर्जाची परतफेड थकली होती.
डीएसकेंनी एकूण ५९० कोटींचा गंड घालणे ही पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातील मोठी बाब ठरली आहे. तसेच, याप्रकरणी आता थेट सीबीआयनेच गुन्हा दाखल केल्याने डीएसकेंना आता या प्रकरणालाही सामोरे जावे लागणार आहे.
Pune Builder DSK 590 Crore Fraud CBI FIR