ब्लिसफुल विंड्स च्या विद्यार्थ्यांनी केले अनोख्या पद्धतीने गुरुपूजन
संदीप अघोर
दर्दी पुणेकर रसिकांनी दि. 14 ऑगस्ट 2023 रोजी एक अविस्मरणीय सायंकाळ अनुभवली – निमित्त होते “गुरुपूजन सोहळ्याचे” !
श्री. मृगेंद्र मोहाडकर यांच्या “ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशन” च्या जवळपास 52 विद्यार्थ्यांनी मिळून गुरुपौर्णिमेनिमीत्त.. आपण शिकत असलेल्या “बासरी वादनाच्या” कलेचे सुश्राव्य सादरीकरण करून आपल्या गुरुजनांचे पूजन केले.
म्हणतात ना कलाकार हा आयुष्यभारासाठी शिष्यच असतो, या उक्तीचे प्रत्यंतर आज आवर्जुन दिसले – आज कलाक्षेत्रात बासरीवादनासाठी श्री. मृगेंद्र यांचे ‘चांगले’ नाव होत असले तरी आजही ते पं. रुपक जी कुलकर्णी यांचे कडे नियमित तालीम घेत आहेत – आणि म्हणूनच आपल्या गुरुंना, त्यांनीच शिकविलेल्या विद्येचे हे “सुश्राव्य पुष्प” सर्व विद्यार्थ्यांच्या बासरीवादनाने पुनरार्पण करणे हीच एका अनोख्या गुरु परंपरेची सुरवातच म्हणावी लागेल.
तुडुंब भरलेल्या पुण्याच्या एस.एम. जोशी सभागृहाने “नवख्यांचे गुणदर्शन – जाणकारांचे निपुणता दर्शन” याचा यथेच्छ आनंद लुटला. वातावरण तेंव्हाच भारावून गेले जेंव्हा श्री. मृगेंद्र मोहाडकर यांनी आपला शिष्य राहूल याचे सोबत बासरी वादन करीत – “व्यासपीठावर विराजमान आदरणिय पं. रुपक जी कुलकर्णी” यांना गुरुवंदना सादर केली.. बासरीच्या सुरांना साथ लाभली ती श्री. कल्याण पांडे यांच्या तबल्याची !
त्या दोघांनी बागेश्री रागाचे सादरीकरण करून सर्वच श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले.
*या सादरीकरणानंतर श्री. मृगेंद्र व त्यांची पत्नी सौ. श्रेया यांनी *आदरणीय पं. रुपक जी कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी – गुरु माँ, सौ. रुपाली जी – यांचे पाद्यपूजन केले आणि “निती भक्ती कृती” या त्रयीच्या मिलाफाने गुरुपुजन सोहळ्याचे हे हृद्य उदाहरण समस्त शिष्यगण आणि रसिक प्रेक्षकांच्या पुढे सादर केले.*
त्यानंतर सभागृहात उपस्थित अनेक मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला – त्यांना छानशा रोपट्याची एक कुंडी, ‘छोटीशी स्मरणभेट’ म्हणून प्रदान करण्यात आली.
आवर्जुन नावे घ्यावीत असे अनेक दिग्गज या आनंद सोहळ्यासाठी उपस्थित होते.. ज्यात आ. पं. रामदास पळसुले, पं. राजेंद्र कुलकर्णी, विदुषी मंजुषा पाटील कुलकर्णी, श्री. अमर ओक, सुश्री. श्रृती भावे, विदुषी मंजीरी ताई कर्वे – आलेगांवकर ही नावे अवर्जुन घ्यावी लागतील. अशा या मान्यवरांच्या उपस्थितीने ह्या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण – ज्याची सर्वजण अति उत्सुकतेने वाट पाहत होते त्याची सुरुवात पं. रुपक कुलकर्णी यांच्या बासरीवादनाने झाली – त्यांना तबल्याची साथ लाभली ते व्यक्तीमत्वही तितकेच उत्तुंग – तबल्यावर होते पं. रामदास पळसुले! – मग काय विचारता “बासरी अन् तबला” या नादब्रह्माने या भूतलावर साक्षात स्वर्गाचीच अनुभूती उपस्थितांना मिळवून दिली यात नवल ते काय?
पंडीतजींनी आपल्या या ‘प्रिय शिष्यासाठी’ गान सरस्वतीचा दरबारच डोळ्यासमोर उभा केला ..
रामदासी मल्हार आणि सामरिन मल्हार या दोन अनवट रागांच्या सरींच्या वर्षावात गुरुजींनी रसिकांना अक्षरशः भावार्द्र करून टाकले अन् यातून उलगडत गेली ती “फक्त आणि फक्त मंत्रमुग्धता” ..!!
बासरीचे मृदुल स्वर इतके मोहक अन् भान हरपविणारे होते की श्रोते टाळ्याही वाजवायला विसरले… सर्वजण भानावर आले ते तबल्याच्या खड्या बोलांनी …!! अन् मग या दोघांना दाद देण्यासाठी अख्खे सभागृह उभे झाले… आसमंत अक्षरशः टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला..
‘भान हरपणे अन् भानावर येणे’ ह्या आवर्तनांच्या हिंदोळ्यावर विराजमान श्रोतृवृंदाला तर हा कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते.. पण घड्याळाच्या दोन्ही काट्यांनी कालचक्राशी इमान राखत समय सिमेची जाणीव करून देत समाधिस्तांना व्यवहारिक जगात परत आणण्याचे काम चोख बजावले.
कार्यक्रमाच्या समापनाच्या क्षणी तर गुरुजींच्या सुरावटीत ‘समस्त श्रोतृगण तल्लीन होऊन गेलेला अन् समस्त शिष्यांचे नेत्र आनंदाश्रुंनी थबथबलेले..’ असे हे अनोखे गुरुपुजन क्वचीतच बघायला मिळते आणि म्हणूनच उपस्थित प्रत्येकच श्रोत्याच्या मनात हा एकच विचार होता “आपण थोर भाग्यवान – जे या कार्यक्रमास उपस्थित राहु शकलो.”
तसा गुरुपौर्णिमेचा हा “ब्लिसफुल विंड्स” चा पहिलाच जाहिर कार्यक्रम – पण अतिशय बहारदार पद्धतीने सादर केला गेला – आणि याचे वैशिष्ठ्य असे की सर्व जबाबदाऱ्या विविध वयोगटांतील समस्त शिष्यगणांनी स्वयंस्फुर्तीने वाटून घेतलेल्या – त्यानिमीत्ताने कलागुणांसोबतच त्यांच्या ‘नेतृत्व आणि कर्तृत्व’ गुणांचीही चांगली जोपासना झाली..
*अशा निरलस वृत्तीने कार्य करणाऱ्या या “ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशन” ला समाज ऋण मानणाऱ्या अनेकांनी दातृत्वाचा हात पुढे न केला असे होऊच शकणार नाही – यात प्रामुख्याने *झायलेम आणि कान्हा* या संस्थांनी सढळ हाताने केलेल्या मदतीचा उल्लेख न करणं हे कृतघ्नपणा चं ठरेल.
आता पुणेकरांना यापुढेही – दरवर्षी अशीच “दर्जेदार श्राव्य मेजवानी” ‘ब्लिसफुल विंड्स’ तर्फे मिळत राहिल यात शंकाच नाही..!!
Pune Blissful Winds Student Gurupujan