पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, अशोक पवार, माधुरी मिसाळ, रवींद्र धंगेकर, राहुल कुल, श्रीकांत भारतीय यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपल्या कुटुंबातले घटक, अजातशत्रू खासदार गिरीश बापट सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. ते सर्वसामान्यांचे नेते होते. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला आपला माणूस वाटत होते. अनेक आंदोलनातून त्यांचे नेतृत्व उभे राहिले. नगरसेवक, महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, पाचवेळा विधानसभेवर आमदार आणि त्यानंतर लोकसभेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले.
स्व. बापट यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान मंत्री म्हणून काम केले. त्यांनी आपली कारकीर्द, प्रत्येक भूमिका प्रचंड यशस्वी केली. अजातशत्रू अशा व्यवहारामुळे विधानमंडळात चांगला कारभार चालवला. नागरी पुरवठा मंत्री म्हणून पहिल्यांदा राज्यात संपूर्ण रेशन कार्डांचे आधार जोडणी करून १ कोटी बोगस रेशन कार्ड शोधून काढले आणि नवीन १ कोटी गरिबांना रेशन देण्याचे काम केले. त्यांच्या जीवनाच्या पानाशिवाय पुण्याचा इतिहास पुढे जाऊ शकणार नाही. तब्येत खराब असतानाही त्यांनी लढाई कधीच सोडली नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संपूर्ण शासकीय इतमामात स्व. बापट यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज स्व. बापट यांचे सुपुत्र गौरव बापट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, मनपा आयुक्त विक्रम कुमार आणि लोकसभा अध्यक्ष यांच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. स्व. बापट यांना श्रद्धांजली देण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, रमेश बागवे, माजी खासदार संजय काकडे, अमर साबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, उल्हास जोशी, नरेंद्र पवार, शरद ढमाले, आशिष देशमुख यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
Shri Girish Bapat Ji was a humble and hardworking leader who served society diligently. He worked extensively for the development of Maharashtra and was particularly passionate about Pune's growth. His passing away is saddening. Condolences to his family and supporters. Om Shanti pic.twitter.com/17M0XpcwpF
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2023
येथील भाजप खासदार गिरीश बापट (वय ७२) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते दीर्घ आजाराला तोंड देत होते. येथील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. पुणे शहर व जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
गिरीश बापट हे टेल्को कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. याच कंपनीत त्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरू केले. त्यानंतर त्यांनी १९७३मध्ये राजकारणात प्रवेश केला. १० वर्षांच्या प्रयत्नांनंतर १९८३मध्ये ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून विजयी झाले. त्यांनी नगरसेवक म्हणून उत्तम काम केल्याने मतदारांनी त्यांना पुन्हा संधी दिली. ते सलग ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.
१९९३ मध्ये बापट यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढविली. पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी १९९५मध्ये विधानसभा निवडणूक लढविली. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. तसेच कामाची हातोटीही चांगली होती. याचीच दखल घेत कसबा पेठ मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यामुळेच बापट हे तब्बल ५ वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात बापट यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद आणि ग्राहक संरक्षण हे खाते होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला. २०१९ मध्ये त्यांना पक्षाने लोकसभा निवडणूक लढविण्यास सांगितले. त्यात ते विजयी झाले. विक्रमी मते त्यांना मिळाली होती.
पुणे कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचेही दीर्घ आजाराने काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आता पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचेही दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
दरम्यान, बापट यांनी नुकत्याच झालेल्या कबसा पेठ पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांची अवस्था पाहून अनेकांना गहिवरुन आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते उपचार घेत होते. मात्र, त्यांची प्राणज्योत आज मालवली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट जी यांच्या निधनाच्या वृत्ताने अतिशय दुःख झाले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि बापट कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
ओम शांती ? pic.twitter.com/6Q2OHSYhRo
— Manoj Kotak ( Modi Ka Parivar ) (@manoj_kotak) March 29, 2023