पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सखुबाई गबाजी गवळी उद्यानासमोरील अद्ययावत बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन करण्यात आले. या वाहनतळामुळे भोसरी येथून आळंदीकडे जाणारा मुख्य रस्ता बाजारपेठेतील असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर तळमजला अधिक ३ मजले असे पार्किंग करण्यात येणार आहे. यामध्ये ७५ चारचाकी तर १५० दुचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था आहे. वरील मजल्यांवरून ये-जा करण्याच्या दृष्टीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहकाचे नियोजन करण्यात आले आहे.
चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट व पाहणी
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. या योजनेमुळे मनपा हद्दीत नव्याने जोडल्या गेलेल्या (२००८ ते २०१० या कालावधीतील) गावांची पाण्याची मागणी पूर्ण करणे शक्य आहे. योजनेमुळे सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर येणारा भार कमी होऊन शहरातील सर्व भागांना पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
उद्यान व जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण
पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील तळवडे येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यान व जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. श्री.पवार यांनी उद्यानाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे आदी उपस्थित होते. तळवडे उद्यान अंदाजे १ एकरामध्ये विकसित करण्यात आले असून त्यामध्ये ३०० मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळण्या, खुली व्यायाम शाळा, लॅन्डस्केपिंग, फलोत्पादनविषयक कामे करणेत आले आहेत.
इको जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी भक्ती-शक्ती चौकातील इको जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन केले. ६ ते ८ मीटर रुंदी असलेले मातीचे जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आले असून वृक्षारोपण व लॉन तयार करण्यात आले आहे. सोबत खुली व्यायामशाळा व मुलांसाठी खेळण्याची जागा असणार आहे.