पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेडिओ म्हणजेच आकाशवाणी केंद्र हे जुन्या काळातील प्रभावी समाज माध्यम म्हणून ओळखले जात असे काळाच्या ओघात आता रेडिओ कुठेतरी मागे पडला, तरीही अद्याप आकाशवाणीच्या बातम्या ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या मोठी आहे, त्यातच पुणे आकाशवाणीच्या बातम्या सकाळी ऐकणे हा अनेकांचा नित्य नियम आहे, परंतु यापुढे आता या श्रोत्यांची गैरसोय होणार आहे. कारण देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पुणे आकाशवाणीवरून यापुढे बातम्या प्रसारित होणार नाहीत. आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे.
४० वर्षांपासून सेवा
आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. पुणे वृत्त विभागाची जबाबदारी आता छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी केंद्रांकडे सोपवण्यात येणार आहे. मात्र पुण्यातील वृत्त विभागच बंद होत असेल तर छत्रपती संभाजीनगरला बातम्या कशा पाठवल्या जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील या केंद्राची स्थापना सन १९५३ मध्ये झाली होती. देशात आकाशवाणीच्या पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते आहेत. सुमारे २४ लाख श्रोते नियमितपणे कार्यक्रम ऐकतात. या केंद्रावरून गेल्या ४० वर्षांपासून बातम्या प्रसारित होत होत्या. मात्र आता हे वृत्त केंद्र अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नियमित बातम्या ऐकणाऱ्या श्रोत्यांची नक्कीच गैरसोय होणार आहे.
सर्वाधिक श्रोते
केंद्रीय प्रसार भारतीने धोरणात्मक निर्णय घेतल्याने, त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग १९ जूनपासून बंद होत आहे. आता हेच बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होईल. आकाशवाणी पुणे केंद्रावरुन सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पहिले बातमीपत्र सादर केले जाते, त्यानंतर मग ८ वाजता, मग १० वाजून ५८ मिनिटे आणि ११ वाजून ५८ मिनिटे त्याचबरोबर संध्याकाळी ६ वाजता अशी बातमीपत्रे सादर केली जातात. आता पुण्याची ही सगळी बातमीपत्रे छत्रपती संभाजीनगरवरुन प्रसारित करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे.
यापूर्वीही निर्णय
पुणे वृत्त विभाग बंद करण्याच्या हालचाली यापूर्वीच सुरु होत्या. आधी भारतीय माहिती सेवेतील अधिकाऱ्यांची पुण्यातील दोन पदे अन्य केंद्रावर हलवण्यात आली. त्याचवेळी हा विभाग आता कायमचा बंद करण्यात आला आहे. वास्तविक आकाशवाणी पुणे केंद्र आणि श्रोत्यांचे एक घट्ट नाते आहे. अगदी अबालवृद्ध हे आकाशवाणीचे चाहते आहेत. त्यामुळेच देशातील आकाशवाणीच्या विविध केंद्रांपैकी सर्वाधिक श्रोते हे पुणे केंद्रालाच लाभले आहेत.