पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. भल्या पहाटेपासून कामाला लागणारे अजितदादा कुठेही जायचे असेल तर वेळेवर जातात. त्यांच्या या गुणामुळे अनेक जण अडचणीतदेखील येत असतात. नुकत्याच एका कार्यक्रमात अजितदादा आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यात वक्तशीरपणावरून चांगलाच सामना रंगला. वक्तशीरपणावरून झालेली ही दादागिरी सध्या चर्चेचा विषय आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात धुसफूस सुरू असतानाच एका कार्यक्रमात दोघांमध्ये वेळेवर येण्यावरून चांगलीच जुंपली. जिल्हा परिषदेने जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि अध्यक्ष चषक पुरस्कार व शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी दोघांना निमंत्रित केले होते. कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण सुरु असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी पोहचले. त्यावरुन उपस्थितांना उद्देशून बोलताना अजित पवारांनी कार्यक्रमाला उशिरा येण्यावरुन चिमटे काढले.
अजित पवार म्हणाले की, आजकाल जीवनमान बदललं आहे. त्यामुळे निट आणि फिट राहिलं पाहिजे. कुणालाही विचारले तरी दादा व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. काहीही झाले की व्हायरल. त्यामुळे सवयी चांगल्या लावा, वेळा पाळा. कार्यक्रमाला वेळेत जायला शिका. त्यानंतर चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, अजित पवार हे ओरखडा न काढता चिमटा काढतात. पुढच्या काळात काय केले पाहिजे, याच्या सुचना दिल्यामुळे दादांना जे म्हणायचे होते तेच मला म्हणायचे होते. दादांच्या भाषणाला माझे मम.. असे म्हणून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांचा सल्ला मानून घेतला.
निकाल शून्य टक्के का?
इयत्ता ८ वी शिष्यवृत्तीत बारामतीचा निकाल शून्य टक्के लागल्याच्या मुद्द्यावरही अजित पवार बोलले. ‘आम्ही मर, मर सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो; परंतु निकाल शून्य टक्के लागत असतील तर आता कपाळ फोडायचे का? आमची लोकं काय करतात,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Pune Ajit Pawar Politics Chandrakant Patil Timing