विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अन्याय अत्याचाराच्या घटना जगभरात घडत असतात. तसेच या घटनांची छायाचित्रे देखील समाज माध्यमात प्रदर्शित झाल्यास त्याविरुद्ध जनमानसात असंतोष निर्माण होतो. अशीच एक घटना मे २०२० मध्ये अमेरिकेतील मिनियापोलिस शहरात घडली होती. एका पोलिस अधिकाऱ्याने निर्दयपणे एका कृष्णवर्णीय म्हणजेच निग्रो व्यक्तीला अमानुषपणे मारहाण करीत त्याला ठार मारले होते. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमात प्रसिद्ध झाल्यावर जगभरातून अमेरिकन गोऱ्या पोलिसाच्या या दुष्कृत्यांबद्दल तीव्र संतापाची लाट उमटली होती. हा व्हिडीओ तयार करणाऱ्या १८ वर्षीय मुलीला पुलित्झर पुरस्कार देऊन तिच्या शौर्याबद्दल गौरव करण्यात आला आहे.
पुलित्झर पुरस्कार सोहळा २०२१ मध्ये, खासकरुन एका पोलिस अधिकाऱ्याने अमानुषपणे केलेल्या जॉर्जच्या हत्येचा व्हिडिओ तयार केल्याबद्दल १८ वर्षाच्या डार्नेला फ्रेझियरचा सन्मानित करून तिचा गौरव करण्यात आला आहे. याचा संदर्भ देताना गौरव सामितीने असे म्हटले आहे की, जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येचा व्हिडिओ बनवण्याचे धाडसी काम डार्नेला फ्रेसीयर हिने केले आहे. हा व्हिडिओ जगासमोर आल्यानंतर पोलिसांच्या क्रौर्याबद्दल लोकांना माहिती झाले. त्याच बरोबर, सत्य समोर आणण्यात तिच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेचे सामाजिक कार्य देखील समजले.
याव्यतिरिक्त, मिनियापोलिस स्टार ट्रिब्यूनला या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट कव्हरेजसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्याने ब्रेकिंग न्यूज प्रकारात सातत्याने बातम्या चांगल्या प्रकारे सादर केल्या. तसेच कोरोना विषाणूच्या साथीच्या व्याप्तीसाठी न्यूयॉर्क टाइम्सला लोकसेवा पुरस्कार देण्यात आला. ऑनलाइन पोर्टल बझफिडने आंतरराष्ट्रीय अहवाल प्रकारातील पहिला पुलित्झर पुरस्कार जिंकला.
जॉर्ज फ्लॉयड मृत्यू कसा झाला?
मे २०२० मध्ये मिनेपोलिसमध्ये जॉर्ज फ्लॉइड या ४६ वर्षीय निग्रो व्यक्तीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्याचवेळी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, असे दिसून आले आहे की, मिनियापोलिस येथील पोलिसांनी जॉर्ज फ्लॉयडच्या मानेवर गुडघा ठेवला होता. तसेच जॉर्ज फ्लॉयडचे हात बांधलेले असून हातांना हातकडी होती, परंतु या गोऱ्या पोलिसाने जवळजवळ आठ मिनिटे जॉर्ज फ्लॉइडच्या मानेवर गुडघे ठेवले. या दरम्यान जॉर्ज फ्लॉयड वारंवार असे म्हणत होता की, त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे, परंतु पोलिसाने त्याचे ऐकलेच नाही. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अमेरिकेत लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला आणि अमेरिकेच्या काही शहरांमध्ये दंगल उसळली होती.