मुंबई – विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून, त्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारले आहे. राज्यातील २५० डेपोपैकी शंभर डेपोंमध्ये कर्मचार्यांनी उत्स्फूर्त बंद पुकारला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात संपाचा परिणाम दिसून येत आहे. तर कल्याण डेपो बंद केल्यानंतर मुंबईमध्ये दुपारपर्यंत एसटीची चाके थांबतील. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी एसटीचे कर्मचारी कालपासून उपोषणाला बसले आहेत. कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत बुधवारी रात्री तोडगा न निघाल्याने ते कामबंद आंदोलनावर ठाम राहिले. बीड जिल्ह्यातील माजलगाव, परळी, आंबेजोगाई या बसस्थानकातून एकही बस बाहेर गेलेली नाही. सांगली बस्थानकात कर्मचाऱ्यांनी जमून सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. नंदुरबार स्थानकातून एकही बस बाहेर न पडल्याने एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. धुळे बसस्थानकात बाहेर गावाहून आलेल्या बस स्थानकातच उभ्या केल्या आहेत. त्यामुळे ऐन दिवळाच्या तोंडावर एसटी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक प्रवासी खासगी वाहतुकीचा पर्याय निवडत आहेत. खासगी वाहतूकदार प्रवाशांची लूट करत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
राज्य शासनाने अडीच हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयावर एसटी कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य कर्मचार्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा अशी कामगार संघटनांची मागणी आहे. या मागणीसाठी कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. कोरोना काळात नैराश्य आणि आर्थिक विवंचनेत आतापर्यंत २६ एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केली आहे. एसटी महामंडळ कर्मचार्यांना राज्य शासनात विलीन करा, कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना सेवेत सामावून घ्या अशा मागण्या कर्मचार्यांनी केल्या आहेत.