नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा 13 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 ते 2.00 यावेळेत जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे. या ई लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी 11 जुलै 2022 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, या जाहिर ई-लिलावात इच्छुक नागरिकांनी सहभाग घेण्यासाठी 6 ते 11 जुलै 2022 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे 45 हजार रूपये रक्कमेचा RTO, NASHIK या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सह नाव नोंदणी करून प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच या जाहीर ई-लिलावात टाटा मोटर्सची MH-16,B9024 बस, अशोक लेलँड MH-15,AK2349 आणि MH-08,E9052 बस या 3 वाहनांचा समावेश असून या लिलाव प्रक्रियेत जीएसटी धारकांनाच सहभाग घेता येणार आहे.
वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखली अटकवून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांना कर अदा करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोच देयक टपालाने नोटीस देण्यात आली आहे. लिलाव करण्यात येणारी वाहने नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक, बोरगाव सिमा तपासणी नाका, येवला बस डेपो, येथे पाहणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जाहीर ई- लिलावाची प्रक्रिया कोणतेही कारण न देता तहकूब करण्याचा अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकारी यांना देण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या वाहन मालकांना लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्याची संधी देण्यात येत आहे, याची संबंधित मालकांनी नोंद घ्यावी, असेही कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी सांगितले आहे.
सदरचा जाहीर ई-लिलावाच्या अटी व शर्ती 6 जुलै 2022 पासून www.eauction.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे उपलब्ध करून देण्यात आली असून वाहने “जशी आहेत तशी” या तत्वावर जाहीर ई- लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार असल्याची माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.