इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात अगदी लहान वयाच्या मुलापासून ते किशोरवयीन मुलापर्यंत मोबाईल गेमचे नव्या पिढीला इतके व्यसन लागले आहे की, केवळ त्यांच्या पालकांनाच नव्हे तर समाजातील सर्वच घटकांना याची सध्या मोठी चिंता लागून आहे. मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन किती घातक आहे याचा प्रत्यय नुकताच आला, मोबाईल गेमच्या व्यसनातून एका मुलाने आपल्या स्वतःच्याच आईचा खून केला.
लखनऊच्या पीजीआय परिसरातील पंचमखेडा यमुना पुरममध्ये १६ वर्षीय तरुणाला मोबाईलवर बॅटल ग्राउंड गेम (जुने नाव PubG) खेळण्याचे प्रचंड व्यसन लागले. हा गेम खेळण्यास आईने नकार दिल्याने त्याने थेट आईला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारले. इतकेच नव्हे तर १० वर्षीय बहिणीला धमकावले आणि तीन दिवस आईचे प्रेत घरातच ठेवले. तसेच तो मुलगा बहिणीसोबत घरात राहिला. रात्री दुर्गंधी सहन न झाल्याने त्याने बाहेरगावी असलेल्या वडिलांना फोन करून माझ्या आईची दरोडेखोराने हत्या केली असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर पोलीसांना माहिती मिळाली. पोलिसांच्या चौकशीत खरा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर उर्फ अक्षांश हा परिसरात असलेल्या एका शाळेतील दहावीचा विद्यार्थी आहे. त्यांचे वडील नवीन सिंग हे लष्करात ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर पदावर आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे आहे. तर हा मुलगा त्याची ४० वर्षीय आई साधना आणि बहिणीसोबत राहत होता. रात्री त्याने वडिलांच्या नावाने परवाना असलेल्या पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आईची हत्या केली.
यावेळी बहीण दुसऱ्या खोलीत होती. गोळ्यांचा आवाज ऐकून ती पळून बाहेर गेली. थोड्या वेळाने ती परत आली. त्याने बहिणीला धमकावले. आईच्या मृतदेहासोबतच त्याने तीन दिवस घरात काढले. बहिणही त्याच्यासोबत होती. त्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी वाढली. किशोरला ते सहन न झाल्याने त्याने वडिलांना फोन करून खोटी माहिती दिली की, माथेफिरू तरुण घरात आला होता. त्याने आईची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर आम्हा सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली.
वडिलांनी तत्काळ पोलिसांना आणि शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घरी येऊन तपास सुरू केला. घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमने पाहणी केली असता खोलीतून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान मुलाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याचवेळी त्याच्या बहिणीची स्वतंत्रपणे चौकशी केली असता तिने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर या आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी मुलाची आई ही अनेकदा त्याला मोबाईलवर गेम खेळण्यास मनाई करत होती. याचा त्याला राग आला. आईशी वारंवार भांडण व्हायचे. त्याला मोबाईल गेम्सचे व्यसन लागले. खेळामुळे तो खूप हट्टी झाला होता. मात्र चौकशीत आरोपी मुलाने सर्व कबुली दिली असून त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.