विशेष प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारने काही तोट्यातील बँकांचे दुसर्या मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेषत : बँक खात्यामध्ये ग्राहकांचे पीएफचे पैसे काढण्यास समस्या निर्माण होऊ शकते .
कोरोना संकटामुळे अनेकजण बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कुटुंबाचा संसार गाडा चालविणे देखिल कठीण होऊन बसले आहे. अशावेळी भविष्य निर्वाह निधीचे ( पीएफ ) पैसे उपयोगी पडू शकतात.
केंद्र सरकारनेही या संकटाच्या प्रसंगात मदतीसाठी इपीएफओ धारकांना अनेक सवलती देऊ केल्या आहेत. मात्र, अडीअडचणीच्या प्रसंगात तातडीने पैसे पाहिजे असतील तर तुमचे बँक खाते इपीएफओला लिंक असणे गरजेचे आहे. त्यासाठी बँकेतील केवायसी अपडेट हवेत. तसेच एखादी बँक दुसऱ्या बँकेत विलीन झाली असेल तर तुमचे खाते अपडेट होणे गरजेचे आहे. अन्यथा ग्राहकांना पीएफ काढताना अडचणी येऊ शकतात.
एखादी बँक विलीन ( मर्ज ) झाल्यानंतर तिचे अस्तित्वच संपुष्टात येते. त्यामुळे संबंधित बँकांचे आयएफएससी (IFSC ) कोड निरुपयोगी ठरतात. त्यामुळे संबंधित बँकातील इपीएफओ धारकांनी आपली खाती अपडेट करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला खाते अपडेट करणे गरजेचे आहे. त्यानंतर इपीएफओच्या संकेतस्थळावर जाऊन नव्या बँकेचा तपशील अपडेट करावा. इपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र बँक , सिंडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स , अलाहाबाद बँक , यूनायटेड बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक यांचे IFSC कोड १ एप्रिलपासून कालबाह्य झाले आहेत.
इपीएफओच्या घोषणेनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्यांना EPFO खात्यातून आगाऊ पैसे काढले होते. त्यांना आता दुसऱ्यांदा पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. इपीएफओच्या खात्यातील ७५ टक्के रक्कम किंवा मूळ वेतन व महागाई भत्ता पीएफधारकांना खात्यामधून काढता येतील.
कोरोनाच्या काळात ज्यांची नोकरी गेली आहे, जे लोक एका महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार आहेत ते पीएफधारक आपल्या खात्यातून ७५ टक्के रक्कम काढू शकतात.
इपीएफओच्या ईडीएलआय योजनेतंर्गत विम्याचा लाभ सात लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पीएफधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला सात लाख रुपये मिळतील.
इपीएफओ खाते आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत १ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार ईपीएफओ खात्याशी लिंक न केल्यास कंपन्यांना पीएफ खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत.
एखाद्या व्यक्तीने नोकरी सोडल्यानंतरही त्याला आपल्या ईपीएफओ खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता येते.