पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर अनेक फायदे मिळतात. कर्मचार्यांच्या उतार वयात आर्थिक चणचण भासत नाही. एलआयसी प्रीमियम भरणे, निष्क्रीय खात्यावर व्याज आदी लाभ नोकरी करताना आणि नंतरही मिळतात. याबद्दल अनेक खातेधारकांना ठाऊक नसते. ईपीएफओ खातेधारकांना काय लाभ मिळतात हे जाणून घेऊयात.
मोफत विमा सुविधा
कोणत्याही कर्मचार्याचे पीएफ खाते उघडताच त्याला त्याच क्षणी विमा सुरू होतो. एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स अंतर्गत कर्मचाऱ्यांना सात लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. ईपीएफओच्या सक्रिय सदस्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या नामांकित किंवा कायदेशीर वारसाला सात लाख रुपयांपर्यंतचा विम्याचा लाभ मिळतो. हा लाभ कंपन्या आणि सरकार आपल्या कर्मचार्यांना उपलब्ध करून देतात.
एलआयसी हफ्त्याची सुविधा
कोरोना महामारीमुळे प्रत्येक सामान्य माणसाला आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. एखाद्याचा एलआयसीचा हफ्ता सुरू असताना तो थकला असेल तर ते पीएफ खात्याची मदत घेऊ शकतात. त्यासाठी निर्धारित अर्ज असतो. तो भरून दिल्यानंतर ईपीएफओकडून खातेधारकांना हफ्त्याची परतफेड दिली जाते.
आजारी असताना
आजारी असताना कर्मचारी पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. त्यासाठी ईपीएफओच्या संकेतस्थळावर पैसे काढण्याच्या विंडोवर जाऊन आजारी असल्याचा पर्याय निवडावा लागतो. ऑनलाइन अर्ज केल्याच्या काही दिवसांत पैसे मिळतात.
निष्क्रीय खात्यावरही व्याज
कर्मचार्यांच्या निष्क्रीय पीएफ खात्यावरही व्याजाची रक्कम मिळते. २०१६ मध्ये कायद्यात झालेल्या दुरुस्तीनुसार आता तीन वर्षांपासून निष्क्रीय झालेल्या खात्यावरही व्याजाचे पैसे मिळू शकतात. यापूर्वी असे व्याज देण्याची कायद्यात तरतूद नव्हती.