सिडनी – ऑस्ट्रेलियात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या शेकडो जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे अनेकांना दंड ठोठावण्यात आला आहे. पोलिस काही निदर्शनांमध्ये चकमक झाल्याने यात सात पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. यावेळी हिंसक जमावाला पांगविण्यासाठी अधिकाऱ्यांनी आंदोलकांवर मिरचीच्या तिखट पाण्याची देखील फवारणी केली. कोरोना संकट सुरू झाल्यापासून प्रथमच जगात अशा प्रकारे लॉकडाऊन विरोधात हिंसक घटना घडली आहे.
लॉकडाऊनच्या विरोधात देशभरातील अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली. सर्वात जास्त हिंसक निदर्शने मेलबर्नमध्ये झाली. सिडनीत दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे, तर मेलबर्न आणि राजधानी कॅनबेरा या महिन्याच्या सुरुवातीला लॉकडाऊनमध्ये आहेत. लॉकडाऊनच्या नियमांनुसार लोक त्यांच्या घरात बंधीस्त असून त्यांच्या कार्यात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे निर्बंध असूनही, सिडनीच्या न्यू साउथ वेल्स राज्यात शनिवारी एकाच दिवसात संक्रमणाची सर्वाधिक 825 नवीन प्रकरणे नोंदली गेली. अत्यंत सांसर्गिक डेल्टा विषाणूची प्रकरणे अनेक शहरांमध्ये नोंदवली जात आहेत. आंदोलकांच्या मते, लॉकडाऊन संपले पाहिजे, परंतु अधिकारी म्हणतात की, विषाणूचा प्रसार रोखणे आणि जीव वाचवणे आवश्यक आहे.
मेलबर्नमध्ये सुमारे 4,000 लोकांनी रॅली काढून निदर्शने केली. व्हिक्टोरिया राज्य पोलिसांनी 218 लोकांना अटक केली असून 200 पेक्षा जास्त लोकांना दंड केला. तीन जणांना पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. जखमी पैकी सहा पोलिस अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.