नवी दिल्ली – शिर्षक वाचून भारतीय पुरुषांच्या भुवया उंचावतील. पण काळजी करण्याची गरज नाही, कारण हा प्रस्ताव भारत सरकार नव्हे तर दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने ठेवला आहे. आफ्रिकेत पुरुषांना बारा गावच्या भानगडी करण्याची परवानगी त्यांच्या कायद्याने दिल्या आहेत. आता स्त्री-पुरुष समानतेचा नवा पोवाडा आफ्रिकन सरकारने गायला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत आफ्रिकेतील महिलांनाही एकापेक्षा अधिक लग्न करण्याचा अधिकार प्रदान केला जाणार आहे.
भारतात हिमाचल प्रदेशमध्ये एक जुनी प्रथा आहे. येथील पहाडी भागांमध्ये राहणाऱ्या काही जातींमध्ये एक महिला पाच भावंडांशी लग्न करते. एवढेच नाही तर न भांडता सुखाने संसारही करते. महाभारतात द्रौपदीनेही पांडवांशी लग्न केले होते. पण दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकेतील सरकारच्या गृह विभागाने महिलांना हा कायदेशीर अधिकार देण्याचा विचार मांडला असून त्याचा ग्रीन पेपरमध्ये समावेशही केला आहे. म्हणजेच सरकारचा निर्णय जवळपास झाला आहे. त्यामुळे रुढीवाद्यांकडून जोरदार विरोध होत आहे. हा विचार मांडताना लग्न अधिक समावेशी होईल, असा दाखला सरकारने दिला आहे.
विवाह धोरण अधिक बळकट करण्यासाठी विविध स्तरांवरील लोकांशी चर्चा करणार आहे. त्यात मानवाधिकार समूहाने एकापेक्षा अधिक लग्न करण्याचा कायदा सर्वांसाठी समान असायला हवा, असे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेत समलैंगिक विवाहाला आधीपासूनच मान्यता आहे.
येथील संविधान जगातील सर्वांत उदार संविधान मानले जाते, पण पुरुषांसह महिलांनाही एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी मिळाली तर दक्षिण आफ्रिकेची संस्कृती नष्ट होईल, असे मत आफ्रिकेतील प्रसिद्ध उद्योजक मूसा मसेलेकू यांनी व्यक्त केले आहे. त्यांना चार बायका आहेत, हे विशेष. आफ्रिकेचे संविधान उदार असल्याचे सांगताना त्यांनी महिला पुरुषांची जागा कधीच घेऊ शकत नाही, असेही विधान केले आहे. लग्नाच्या वेळी पुरुषांना हुंडा द्यावा लागतो, तसा आता महिला हुंडा देतील का, असा सवालही त्यांनी केला आहे.
शेजाऱ्यांकडून धडा
दक्षिण आफ्रिकेचा शेजारी देश झिम्बाब्वेमध्ये हा कायदा आधीपासूनच आहे. कदाचित आफ्रिकेने शेजाऱ्यांकडूनच धडा घेतला असवा. झिम्बाब्वेमध्ये पुरुषच बायकोच्या दुसऱ्या लग्नासाठी पुढाकार घेतात, असेही एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.