मुंबई – घर खरेदी करताना महिलांच्या नावावर नोंदणी केल्यास काय फायदे मिळतात याची तुम्हाला कल्पना आहे का? महिलांना सरकारी योजनांचा लाभ आणि करातून मोठी सवलत मिळते. तसेच प्राप्तीकरातही मोठी सवलत मिळते. त्यामुळे अनेक लोक महिलांच्या नावाने नोंदणी करण्यास प्राधान्य देतात.
घर खरेदी करण्यापूर्वी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर त्यातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. महिलांना व्याजदर तुलनेने कमी लागू होतात. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) महिलांना गृहकर्जावर इतर बँकापेक्षा ०.५ टक्के कमी व्याजदर मिळतो. तसेच महिलांच्या नावाने घराची नोंदणी झाल्यास स्टॅम्प ड्युटीतही मोठी सवलत मिळते.
घर खरेदीत महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून राज्यस्तरावर अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेत (पीएमएवाय) कमी उत्पन्न गटातील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी घरातील महिलांच्या नावावर घर खरेदी करणे बंधनकारक आहे.
एसबीआयकडून विशेष योजना
एसबीआयच्या योनो सेवेअंतर्गत मिळणार्या गृहकर्जावर तुम्हाला ५ बीपीएस व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे. एसबीआय ६.७० टक्के व्याजदराने गृहकर्ज देत असून, ३० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे. ३० ते ७५ लाखापर्यंतच्या गृहकर्जावर ६.९५ टक्के व्याजदर आहे. ७५ लाखांवरील कर्जावर ७.०५ टक्के व्याजदर असेल.