नवी दिल्ली – विमा उतरविल्यानंतरही तुम्ही तुमच्या घरातील मौल्यावन वस्तू आणि दागिन्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांच्या सुरक्षेत कुचराई केल्यास तुम्हाला विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. अशाच एका प्रकरणात राज्य ग्राहक आयोगाने विमा कंपनीच्या बाजूने निर्णय दिला आहे.
आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती संगीता धिंगरा सहगल यांच्या नेतृत्वालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तथ्यांचा अभ्यास केला असता विमाधारकाने दागिन्यांच्या बॅगेच्या सुरक्षेत बेजबाबदारपणा केला. मुलीच्या लग्न समारंभात दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी विमाधारकाने आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. ते दागिन्यांची बॅग जेवणाच्या टेबलवर सोडून मंडपातून निघून गेले. ही कृती विमा पॉलिसीच्या अट क्रमांक ३ कडे दुर्लक्ष करण्यासारखी होती. त्यामुळे पॉलिसीच्या अटी-शर्तींअंतर्गत दागिने चोरी गेल्याबद्दल तक्रारकरर्त्याला विम्याचा लाभ दिला जाऊ शकत नाही. मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यात बेजबाबदारपणा केल्याने विमा कंपनी भरपाई देऊ शकत नाही, असा निर्णय आयोगाने दिला. जिल्हा ग्राहक मंचाच्या निर्णयावरुद्ध दाखल विमाधारकाच्या तक्रार याचिकेला फेटाळून ग्राहक आयोगाने हा निर्णय दिला आहे. जिल्हा ग्राहक मंचाच्या निर्णयाविरुद्ध ८ वर्षांपूर्वी दाखल अपिलाचा निपटारा करताना आयोगाने निर्णय दिला.
काय आहे प्रकरण
दिल्ली येथील सुनील कुमार कुकरेजा यांनी २००५ रोजी मुलीच्या लग्नासाठी महागडे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी केली होती. त्यासोबतच त्यांनी घरासह मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांचा द न्यू इंडिया पॉलिसू इन्श्युरन्स कंपनीकडून विमा उतरविला. हा विमा सप्टेंबर २००६ पर्यंत वैध होता. आयोगात दाखल झालेल्या प्रकरणानुसार, हे दागिने मुलीला भेट देणार असल्याची घोषणा कुकरेजा यांनी विमा उतरविताना जून २००६ मध्ये केली होती. त्यानंतर ते जून २००६ मध्ये मुलीच्या लग्नासाठी गुजरातमधील सुरत येथे गेले होते. त्यांच्या तक्रारीनुसार, दागिन्यांनी भरलेली बॅग लग्नाच्या दिवशी चोरी झाली. चोरी झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास केला. परंतु दागिन्यांचा शोध लागू शकला नाही.