इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अलीकडे नवीन चित्रपट आला आणि त्यात तगडी स्टारकास्ट असली तर चित्रपटाच्या कथेइतकीच चर्चा रंगते ती कलाकारांच्या मानधनाची. आपले आवडते कलाकार एखाद्या भूमिकेसाठी किती पैसे आकारतात, याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. नवीन वर्षात असाच एक तगडा चित्रपट येणार आहे. दिग्दर्शक नाग अश्विनचा चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ हा मेगा बजेट चित्रपट असणार आहे.
बिग बजेट चित्रपट
दिग्दर्शक नाग अश्विन हे सायन्स फिक्शन अॅक्शन चित्रपट बनवण्यात सध्या व्यस्त आहेत. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘प्रोजेक्ट के’ चे बजेट ६०० कोटी रुपये आहे आणि २०० कोटी रुपये फक्त कलाकारांच्या मानधनापोटी खर्च केले जात आहेत. १२ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही भागाचे शूटिंग निर्माते एकत्र करणार असल्याचे समजत आहे. चित्रपटाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
मानधनही तगडे
या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना भरघोस मानधन दिले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्रोजेक्ट के’साठी प्रभासला १५० कोटी रुपये, कमल हसनला २५ कोटी आणि अमिताभ बच्चन – दीपिकाला १० कोटी रुपये दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे प्रभासचा नुकताच आलेला चित्रपट ‘आदिपुरुष’ बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतरही प्रभासला एवढे मानधन दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘प्रोजेक्ट के’च्या स्टार कास्टमध्ये आधीच प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि अमिताभ बच्चन यांचा समावेश होता आणि आता कमल हासन यांनाही साइन करण्यात आले आहे. यामुळे चित्रपटाचे बजेट वाढण्याची शक्यता आहे. चित्रपटातील कलाकारांमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती पल्ला गाठतो हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.