मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके (वय ७० वर्षे) यांचे आज येथे निधन झाले. त्यांच्यावर एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यारुपाने चळवळीतील अग्रणी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
फुले आणि आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे ते प्राध्यापक होते. त्याशिवाय ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे उपाध्यक्ष, समता परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे फुले-आंबेडकर विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणाऱ्या सक्रीय कार्यकर्त्याची सेवा खंडित झाली आहे.
समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ महाराष्ट्र सरकारने अद्ययावत करून प्रकाशित केला. या ग्रंथाचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचेही राज्य सरकारने २६ खंड प्रकाशित केले आहेत. त्यातील ६ खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले आहे. त्यांचा फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर मोठा अभ्यास होता. प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा या दोन पुस्तकांचा समावेश आहे. सर्वस्तरातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. समता परिषदेचे अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ हे हॉस्पिटलमध्ये पोहचले असून ते अंत्यदर्शन घेत आहेत.
शरद पवार म्हणाले…
मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले. हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले. हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.
writer professor hari narake passed away
literature fule ambedkar thoughts