नाशिक: नाशिकचे सार्वजनिक वाचनालय हे नाशिकचे सांस्कृतिक व सामाजिक वैभव आहे. कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉ. अ. वा. वर्टी अशा अनेक मोठमोठ्या लोकांनी वाचनालयाचे काम बघितले आहे. मु. श. औरंगाबादकर हे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या नावावरूनच ग्रंथालय भूषण हे नाव आम्ही घेतलं. एक काळ असा होता की गावातले अनेक चांगले लोक वाचनालयात येत. पण गेल्या १०-१२ वर्षात वाचनालय, वाचन, ग्रंथालय चळवळीपेक्षा तंटे, कोर्ट कचेऱ्या व सर्वसाधारण सभेमध्ये होणारे गदारोळ, प्रसंगी धक्क्याबुक्क्या यामुळे जास्त चर्चेत आहे. हल्ली सांस्कृतिक वातावरण राखण हे लोकांना दुर्मिळ वाटायला लागलं आहे, पण त्यामुळे कितीतरी चांगले कार्यकर्ते वाचनालयापासून दूर आहेत. म्हणून तंटामुक्त वाचनालय ही आमची भूमिका आहे, असे मत ग्रंथालय भूषण पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार प्रा. दिलीप फडके यांनी व्यक्त केले.
सध्याचे वाद हे फार मोठे नाहीत. व्यक्तिगत अहंकार, मी मोठा की तू मोठा यातून हे वादाचे विषय तयार झाले आहेत. पण समोरासमोर बसून चर्चा केली तर हे वाद नक्की मिटू शकतात. तंटे सोडवायचे असतील तर ते सलोख्याने सोडवावे लागतात, असा माझा अनुभव आहे असे प्रा. दिलीप फडके म्हणाले. पॅनलच्या भूमिकेविषयी सांगताना ते म्हणाले की, ग्रंथालय भूषण या पॅनलमध्ये नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा संगम आहे. कुठलीही संस्था त्या संस्थेत तरुण किती आहेत यावर ठरते. तरुणांना वाव मिळाला नाही तर संस्थेला वाव राहत नाही.
प्रचाराविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मतदारांना भेटल्यावर माझ्या लक्षात आले की आताची परिस्थिती मतदारांना आवडत नाही. त्यांना बदल हवा आहे. बदल स्वीकारायला ते उत्सुक आहेत. तरुणांच्या उपक्रमाविषयी ते म्हणाले की, मधल्या काळात वाचन हा विषय बदलला आहे. हल्लीची पिढी पुस्तक हातात धरून वाचत नाही. इ बुक्स, ऑडिओ बुक्स, ह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पारंपरिकतेबरोबर नव्या तंत्रज्ञानाकडे आपण वळलं पाहिजे. तरच तरुण एकत्र येतील आणि वाचनालयाकडे वळतील. सावाना सोबत अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे परशुराम साईखेडकर नाट्यगृह. त्याविषयी ते बोलले की, कालिदास आणि पसा नाट्यगृह यांच्यात मार्केटिंग पोझिशनमध्ये बदल आहे. पसा मध्ये होणारे कार्यक्रम आधी पेठे हायस्कूलमध्ये व्हायचे, त्यानंतर पसा नाट्यगृह झाले. कालिदास नाट्यगृह हे मोठ्या नाटकांकरीता किंवा कार्यक्रमांकरिता आहे. पण ते नाशिकचे सांस्कृतिक केंद्र नाही नाशिकचे सांस्कृतिक केंद्र हे पसा नाट्यगृह आहे. नाशिकच्या प्रत्येक कलाकाराला इथे आपला कार्यक्रम सादर करण्याचं स्वातंत्र्य आहे. कलाकारांसाठी पसा नाट्यगृह, सावाना या मातृसंस्था आहेत. आणि त्यात काळानुसार बदल झाले पाहिजे.
आगामी योजनांविषयी बोलताना सांगितले की, नाशिकची आता भौगोलिक वाढ झाली आहे. भारतातील सर्वात जुन्या वाचनालयापैकी एक वाचनालय म्हणून सावाना कडे बघितलं जातं. आज अनेक दुर्मिळ ग्रंथ, पोथ्या आपल्याकडे आहे. ज्ञानी लोकांचा वारसा आपण टिकवला पाहिजे, वाढवला पाहिजे. आज बदलत्या काळात लोकं वाचनालयाकडे येतील अशी अपेक्षा करण्यापेक्षा वाचनालय त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यासाठी काही योजना आखाव्या लागतील. यात शैक्षणिक संस्था, विविध भागांतील समाजमंदिरे यांना सामावून घेता येईल, असे मत प्रा. दिलीप फडके यांनी व्यक्त केले.