नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर झपाट्याने विकास होत असल्यामुळे नाशिक शहराच्या बाहेरून बाह्यबळण रस्ता करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आ. फरांदे यांनी मुख्यमंत्री यांची विधान भवन येथील ऑफिसमध्ये भेट घेऊन त्यांच्याकडे नाशिकसाठी बाह्यबळन रस्ता करण्याची मागणी केली. नाशिक शहरातून मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई- पुणे राष्ट्रीय मार्ग यासारखे विविध राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्ग जात असून जवळपास ७० किलोमीटर पेक्षा जास्त लांबी ही महामार्गांची असल्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच नाशिक येथे झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या संदर्भात लक्षवेधीच्या माध्यमातून सुरू असलेल्या चर्चेच्या दरम्यान सदर माहिती विधानसभा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
आमदार देवयानी फरांदे यांनी याबाबत मागणी करताना महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहने नागरी भागातून मिळवणे भाग पडत असल्याची बाब देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे देखील मुख्यमंत्री यांना सांगितले. शहराचा विकास झाल्यानंतर भूसंपादन करणे ही प्रक्रिया अवघड होत असल्यामुळे बाह्य वळण मार्ग करण्यास नागरिक विरोध करत असतात व सदर बाब खर्चिक देखील होत असते. त्यामुळे नाशिक शहरासाठी बाह्य वळण मार्ग करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. आमदार देवयानी फरांदे यांनी केलेल्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री यांनी एमएमआरडीएला याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. तर लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेण्याचे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले.