मुंबई – कोव्हॅक्सीनच्या नावावर पुन्हा एक वाद उपस्थित करण्याचा प्रयत्न होत आहे. आता कोव्हॅक्सीन घेणाऱ्या लोकांना विदेशात प्रवासासाठी परवानगी मिळणार नाही, असे पसरविले जात आहे. पण केंद्र सरकारने अशाप्रकारचे कुठलेही दिशानिर्देश जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. पूर्णपणे भारतात तयार करण्यात आलेल्या या लसीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
जावडेकर यांनी या अफवांसाठी काँग्रेसवर निशाना साधला आहे. ते म्हणतात की, ‘भारतात तयार होत असलेल्या या व्हॅक्सीनबद्दल पूर्वीपासूनच वाद निर्माण करण्याचे काम होत आहे. काँग्रेस तर याला बीजेपी व्हॅक्सीन म्हणत आहे. कोव्हॅक्सीनला कोरोना व्हॅक्सीन म्हणून मान्यता मिळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेत प्रक्रिया सुरू आहे.’ मुळात एका वर्तमानपत्रातील बातमीनुसार जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी नसल्यामुळे कोव्हॅक्सीन घेणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या देशांचा व्हीसा देण्यास नकार दिला जाऊ शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेने विदेश प्रवासाशी संबंधित कुठला निर्णयच अद्याप घेतलेला नसेल तर असे धोरण आले कुठून, असा सवाल जावडेकर यांनी केला आहे. असा वाद उपस्थित करणे योग्य नाही. कोव्हॅक्सीन सर्वांत प्रभावी आहे. सुरुवातीला काँग्रेसनेही प्रयत्न केला. पण आज अनेक लोक ही लस घेत आहेत, असे जावडेकर म्हणाले.
आरटीपीसीआरचा अहवाल निगेटीव्ह असावा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आश्चर्य व्यक्त करताना म्हटले आहे की, ‘आता तर आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल प्रवासाचा आधार आहे. व्हॅक्सीन पासपोर्टशी संबंधित कुठलाही निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेला नाही.’