इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गडचिरोलीः काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी सत्ताधारी भाजपच्या धोरणांवर टीका केली. काही मोठे प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या नोकऱ्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी आघाडीचे नेते मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्या म्हणाल्या.
गडचिरोली जिल्ह्यातील एका मेळाव्यात बोलताना त्यांनी राज्यातील महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली. महिलांनी चांगल्या आयुष्यासाठी मतदान केले पाहिजे, त्यांना दरमहा १,५०० रुपये मिळतात म्हणून नव्हे, असे सांगून महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सात हजार रुपये हमी भाव देण्याचे त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचा दावा गांधी यांनी केला. फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यामुळे राज्यातील नोकऱ्या गेल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.
युवक प्रयत्न करत आहेत, नवीन कौशल्ये शिकत आहेत; पण तरीही त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. याकडे सरकारचे प्राथमिक लक्ष असायला हवे होते; परंतु ही पदे भरण्यात अपयश आले आहे, अशी टीका करून प्रियंका म्हणाल्या, की महाराष्ट्रातील तरुणांच्या आत्महत्येचा संबंध रोजगाराच्या संधींच्या अभावाशी आहे. देशात सर्वाधिक तरुणांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. त्याचे कारण बेरोजगारी हटवण्यात भाजपच्या अपयशाचा हा परिणाम आहे. विमानतळ, बंदरे आणि काही मोठ्या कंपन्या यासारखी प्रमुख क्षेत्रे अदानीच्या नियंत्रणाखाली आहेत आणि सरकारी धोरणे एका व्यक्तीच्या बाजूने राबविली जात आहेत. सरकारने रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीला राष्ट्रीय संपत्तीचे वाटप करू नये. कारभारात उत्तरदायित्व नसल्याचा आरोप करीत त्यांनी भाजपवर टीका केली.
त्या म्हणाल्या की काँग्रेसच्या राजवटीत आमचे नेते जनतेला जबाबदार होते; मात्र भाजपच्या राजवटीत ही जबाबदारी संपली आहे. मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आता जनतेला जबाबदार राहिलेले नाहीत. अदानींच्या कंपन्यांना छत्तीसगडसारख्या राज्यात आदिवासींच्या जमिनी दिल्या जात असल्याचा मुद्दाही प्रियंका यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सत्तेवर आली, तर रोजगार निर्मिती आणि लोकांना मदत देण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असे घोषवाक्य वापरले. त्याचा समाचार प्रियंका यांनी घेतला. ‘सेफ’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत, सुरक्षा आणि खजिना. या देशात अदानी ही एकमेव व्यक्ती खरोखर सुरक्षित आहे. संपूर्ण देशाला माहीत आहे, की अदानी ही एकमेव व्यक्ती आहे, जिला सरकारी तिजोरीत प्रवेश आहे, तर सामान्य नागरिक संघर्ष करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.