सीतापूर (उत्तर प्रदेश) – लखीमपूर खेरी येथीस हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले होते. मात्र आता पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी सीतापूर येथील पीएसी गेस्ट हाउसमध्ये तात्पुरते कारागृह बनविण्यात आले आहे. प्रियंका गांधी, हरियाणातून काँग्रेसचे राज्यसभा खासदार दीपेंद्र हुड्डा आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय लल्लू यांच्याविरुद्ध पोलिसांनी कलम १५१, १०७, ११६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांना ४ ऑक्टोबरला पहाटे साडेचारला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांना सीतापूरमधील पीएसी बटालियनच्या गेस्ट हाउसमध्ये ठेवण्यात आले आहे. या गेस्ट हाउसला तात्पुरते कारागृह करण्यात आले आहे. प्रियंका गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासह अटक केल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी जोरदार विरोध करत ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आणि लाजीरवाणी असल्याचे म्हटले आहे. प्रियंका गांधी यांना सूर्योदयापूर्वी साडेचार वाजता एका पुरुष पोलिस अधिका-याने अटक केली आहे. त्यानंतर त्यांना आतापर्यंत कोणत्याही दंडाधिकार्यांसमोर उभे करण्यात आले नाही. ही कारवाई पूर्णपणे कायद्याच्या विरुद्ध आहे, असेही ते म्हणाले.
सकाळी पीएमच्या नावाने व्हिडिओ
प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे एक व्हिडिओ जारी केला. त्यावर त्यांनी लखीमपूरमध्ये शेतक-यांना चिरडणा-या वाहनाचा व्हिडिओ दाखवत हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का, असा प्रश्न केला. या प्रकरणी आतापर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना बरखास्त करण्यासह आशिष मिश्राला अटक न केल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
रॉबर्ट वाड्रांकडून चिंता व्यक्त
प्रियंका गांधी यांना अटक केल्यानंतर सोमवारी त्यांचे पती रॉबर्ड वाड्रा म्हणाले, की उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे म्हणून ते काहीही करतील असा त्याचा अर्थ होत नाही. लखीमपूरमध्ये जे काही घडले ते सामान्यपणे घडत नाही. या घटनेमुळे संपूर्ण देशात आक्रोश आहे. विरोध करणार्या शेतक-यांवर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने वाहनाखाली चिरडले. सरकारने यावर कठोर कारवाई केली पाहिजे. प्रियंका गांधी पीडितांच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्या आहेत. त्या त्यांना भेटूनच येतील. सरकारने त्यांना रोखू नये. महिला सुरक्षेबद्दल गप्पा मारतात आणि आता एका महिलेशी असे वर्तन करतात हे योग्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसकडून निदर्शने
सीतापूर पीएसी गेस्ट हाउसच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी निदर्शने केली. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान त्यांचा पोलिसांशी वाद झाला. काँग्रेसने या प्रकरणावरून संघर्षाची घोषणा केली आहे.