विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या सुरू आहे. सरकारी केंद्रात ही लस मोफत मिळत आहे. तर, येत्या २१ जून पासून सर्वांनाच ही लस सरकारी केंद्रात मोफत मिळणार आहे. मात्र, खासगी केंद्रांमध्येही लस घेण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आणि याच केंद्रांमध्ये लसीसाठी नक्की किती पैसे मोजायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही केंद्रांमध्ये तर अवाजवी पैसे घेतले जात असल्याचेही सांगितले जात आहे.याची दखल घेत केंद्र सरकारने खासगी केंद्रांमधील लसीच्या किंमती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार, कोविशिल्ड लसीसाठी ७८० रुपये, कोवॅक्सिनसाठी १४१० तर स्पुतनिक ५ या लसीसाठी ११४५ रुपये आकारले जाणार आहेत. यापेक्षा अधिक पैसे घेण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे. त्यामुळे खासगी केंद्रात आपण लस घेत असाल तर आपल्याला लसीची ही किंमत माहिती असणे आवश्यक आहे.