नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खाजगी बसेसच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने बसेसची विशेष तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्लीपर बस चालक व मालक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथे आपल्या बसेस पुर्न:तपासणी करून प्रमाणित करून घ्याव्यात, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी कळविले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे स्लीपर बसचे अपघात रोखणे व आपत्कालीन प्रसंगी जीवीतहानी टाळण्यासाठी उपाययोजना व सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
अशा आहेत सूचक उपाययोजना
1. बसचा आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. त्यासमोर व मागे कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये. आपत्कालीन दरवाजाच्या दर्शनी भागात हॅमर उपलब्ध होणे आवश्यक आहे.
2. आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्याचे मार्ग तसेच बसमधील अन्य बचावात्मक उपकरणांसबंधीची माहिती प्रवाशांना प्रवास सुरू होण्यापूर्वी देणे आवश्यक आहे. याबाबतची चित्रफित बसमध्ये प्रसारित करण्यात यावी अथवा ईमेल व व्हाट्ॲपद्वारे बसमधील प्रवाशांना चित्रफित प्रसारित करण्यात यावी.
3. वाहन चालक हा मद्यप्राशन अथवा अंमलीपदार्थांचे सेवन करून वाहन चालविणार नाही याची खातरजमा करूनच वाहनमालकांनी वाहनचालकास वाहन चालविण्यास देणे आवश्यक आहे. या संदर्भातील सर्वस्वी जबाबदारी वाहन मालकाची असेल यांची नोंद घ्यावी. तसेच परिवहन विभागाच्या तपासणी दरम्यान वाहनचालक मद्यप्राशन केलेला आढळल्यास मोटर वाहन कायदा कलम 185/S,188 प्रमाणे कारवाईस तो पात्र राहील.
४. वाहन चालक वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणार नाहीत याचीही वाहन मालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. परिवहन विभागाच्या तपासणीत वाहनचालक मोबाईलवर बोलतांना आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील कलम 250 A,177 नुसार होणाऱ्या कारवाईस तो पात्र राहील व वाहनचा परवाना व वाहनचालकाची अनुज्ञप्ती (License) निलंबित करण्यात येईल.
५. वेळोवेळी वाहनचालकांनी नेत्र व आरोग्य तपासणी करून घ्यावी. दर 2 तासांनी विश्रांती घेण्याबाबत वाहन चालकांना सूचना देण्यात याव्यात.
६. वाहन चालवितांना वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही यादृष्टीने वाहनांना योग्य ते गती नियंत्रक बसविणे, वाहनात बसविण्यात आलेले स्पीड गर्व्हनर उपकरण सुस्थितीत व कार्यान्वीत ठेवणे व वेळोवेळी त्याचे कॅलिब्रेशन करून घेणे याची जबाबदारी वाहन मालकांची आहे.
७. बस मधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असावी. बसमध्ये क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवाश्यांची वाहतुक करू नये. वाहन चालवितांना वाहनचालकांनी लेनची शिस्त पाळणे व दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे याबाबत वाहनचालकांना निर्देश देण्यात यावेत.
८. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विहित मुदतीतमध्ये नुतनीकरण करून घ्यावे तसेच वाहन निरंतरपणे सुस्थितील राहील याची वाहनचालकांनी व वाहन मालकांनी दक्षात घ्यावी.
वरील नियमांचे पालन करून अपघातमुक्त प्रवासी वाहतुक करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.