मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांनी गृह कर्ज दराबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि पंजाब नॅशनल बँकांचा त्यात समावेश आहे. या तिन्ही बँकांनी त्यांच्या गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेने बेंचमार्क कर्जदरात ०.०५ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे नवीन आणि विद्यमान ग्राहकांच्या ईएमआयमध्ये वाढ होईल. रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये सर्वात मोठ्या खाजगी बँकेने ३० दिवसांत केलेली ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी व्याजदरात ०.३५ टक्के वाढ करण्यात आली होती.
बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की एचडीएफसी गृह कर्जावरील किरकोळ प्राइम लेंडिंग रेट ०.०५ टक्क्यांनी वाढवण्यात येत आहे. हा बदल १ जून २०२२पासून लागू झाला आहे. दुसरीकडे खाजगी आयसीआयसीआय बँक आणि सरकारी पंजाब नॅशनल बँकेने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट ०.१५ टक्क्यांनी वाढवला आहे. पीएनबीच्या वेबसाईटनुसार ही दरवाढ १ जूनपासून लागू होणार आहे.
आयसीआयसीआयनेही या रेटमध्ये सुधारणा केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर १ जून २०२२पासून लागू झाले आहेत. त्याचबरोबर बँक ऑफ इंडियानेही रेट वाढवला आहे. हे किमान व्याजदर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्यावर बँक कर्ज देऊ शकते. ही रिझर्व्ह बँकेने ठरवलेली प्रणाली आहे. या प्रणालीनुसार कर्जावरील व्याजदर निश्चित करण्यात येते. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी धोरण समितीची बैठक ६ जूनपासून सुरू होणार आहे. या वाढत्या दरांमुळे कर्ज घेणाऱ्यांच्या खिशाला निश्चितच झळ पोहोचणार आहे. कर्ज घेणं तुलनेने महाग होणार आहे.