नवी दिल्ली – देशात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण सुरू होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. त्यामुळे लशीचे उत्पादन वाढून त्यांच्या किमती कमी होण्याची आशा व्यक्त केली जात होती. परंतु तसे काहीही होताना दिसत नाहीये. उलटपक्षी केंद्र सरकारवर पहिल्यापेक्षा जास्त खर्चाचा भर पडत असून, खासगी केंद्रांवर लस महाग मिळत आहेत. यापुढील काळातही खासगीत लस घेताना चढ्या दरातच घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
या वर्षी जुलैपर्यंत औषध निर्माता कंपन्यांशी बोलणी करून केंद्र सरकारने किंमत ठरविली होती. त्यादरम्यान कोविशिल्डचा एक डोस २०० आणि कोवॅक्सिनची २०६ रुपये अशी किंमत निश्चित केली होती. परंतु नव्या किमतींनुसार ती वाढून प्रत्येकी २०५ रुपये आणि २१५ रुपये इतकी झाली आहे. म्हणजेच कोविशिल्ड लशीच्या एका शिशीवर सरकारला ५० रुपये अधिक (एका शिशीमध्ये दहा डोस) द्यावे लागत आहेत. तर कोवॅक्सिनच्या एका शिशीवर हा खर्च १८० रुपये (एका शिशीत २० डोस) इतका वाढला आहे.
नव्या किमतींनुसार केंद्र सरकारला नवी ऑर्डर द्यावी लागली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १६ जुलैला केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कोविशिल्ड लशीच्या ३७.५ कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. तर भारत बायोटेकला २८.५ कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. एकूण ७५ टक्के लशींचा पुरवठा सरकारी केंद्रामध्ये होत असल्याने किमती वाढण्याचे मोठे कारण असल्याचे मानले जात आहे. भारत बायोटेकची लस स्वदेशी असूनही कोविशिल्डच्या तुलनेत अजूनही महाग आहे. एक मोठा काळ गेल्यानंतरही कोवॅक्सिन लशीचे उत्पादन मंद गतीने होत आहे. दुसरीकडे ही लस सरकारसह सामान्य माणसालासुद्धा महागच आहे.
लशींच्या ऑर्डर कधी
केंद्र सरकारने लस खरेदी करण्यासाठी पहिली ऑर्डर या वर्षी १० जानेवारीला दिली होती. त्यादरम्यान कोविशिल्डच्या १.१ कोटी आणि कोवॅक्सिनच्या ५५ लाख डोसची ऑर्डर देण्यात आली होती. परंतु त्यानंतर फेब्रुवारीत तीन वेळा ऑर्डर (३,१० आणि २४ फेब्रुवारी) देण्यात आली. त्यात कोविशिल्डचे ४.५० कोटी डोसचा तर कोवॅक्सिनच्या फक्त ४५ लाख डोसचाच समावेश होता. त्यानंतर १२ मार्च, ५ मे आणि १६ जुलैला प्रत्येकी १२, १६ आणि ६६ कोटी डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. आतापर्यंत १०० कोटी डोसची ऑर्डर फक्त दोन कंपन्यांनाच देण्यात आली आहे. त्यामध्ये सिरम इन्स्टट्यूटला ६४.१ कोटी डोसची तर भारत बायोटेकला ३६.५ कोटी डोसची ऑर्डर देण्यात आली आहे.
आयसीएमआरला पाच टक्के फायदा
भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही पहिली स्वदेशी लस दिल्लीतील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने तयार केली आहे. या लशीबाबत झालेल्या करारानुसार कोवॅक्सिनच्या प्रत्येक डोसवर आयसीएमआरला पाच टक्के फायदा मिळण्याचे निश्चित झाले आहे. हा फायदा वर्षातील दोन वेळा आयसीएमआरला मिळणार आहे.