इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युक्रेन युद्धासह बाजारातील अस्थिर स्थितीमुळे खासगी कंपन्या अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच एका मागोमाग एक कंपन्यांचे विविध कठोर निर्णय समोर येत आहेत. नेटफ्लिक्स, व्हाईट हॅट ज्युनिअर, वेदांतू या कंपन्यांनंतर आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म CARS24 ने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या सुमारे 600 कर्मचाऱ्यांना सोडचिठ्ठी दिली आहे. कर्मचाऱ्यांची खराब कामगिरी आणि कॉस्ट टू कंपनी या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीचे तब्बल 9 हजार कर्मचारी आहेत. कंपनीचा विस्तार जहभरात आहे. शिवाय आता तर कंपनीचा व्यवसाय भारत, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियामध्ये वाढत आहे. कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “हा नेहमीप्रमाणेच व्यवसाय आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी निगडित दरवर्षी अशाप्रकारे निर्णय होतात.”
वापर झालेल्या कारच्या विक्रीबाबत कंपनी अग्रेसर आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि उत्तम स्थितीतील कारला मोठी मागणी आहे. ही बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राहकांना सेवा देण्यास आम्ही बांधिल आहोत. २०२२ या वर्षासाठी आमचे विशेष नियोजन असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत, विविध क्षेत्रातील अनेक स्टार्टअप्सनी भांडवल वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. बुधवारी ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म वेदांतूने आपल्या ४२४ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मार्च आणि एप्रिलमध्ये अनअकॅडमीने सुमारे 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. तसेच या वर्षाच्या सुरुवातीला, एडटेक स्टार्टअप लिडो लर्निंगने आपल्या 1,200 हून अधिक कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले.