इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रत्येक कंपनीतील कर्मचारी पगारवाढ होत असताना खूपच उत्साहित असतात. आपल्या विश्वासू कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी कंपनीसुद्धा वेगवेगळे लाभ देत असतात. परंतु आम्ही आज ज्या कंपनीबद्दल सांगणार आहोत, तिची ऑफर ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याने लग्न केले, तर संबंधित आयटी कंपनी त्याला पगारवाढ देते. ही खोटी नाही, तर खरी बातमी आहे.
टॅलेंटेड कर्मचारी नोकरी सोडून जाऊ नये, म्हणून श्रीमूक अंबिका इन्फोसोल्युशन नावाची कंपनी अशाप्रकारची अनोखी ऑफर देत आहे. या ऑफरला स्पेशल वेडिंग गिफ्ट नाव देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारावर कंपनीकडून वार्षिक वेतनवाढ दिली जाते. परंतु त्यासह कंपनीने लग्न केल्यानंतरसुद्धा वेतनवाढीचा विशेष नियम बनवला आहे.
एक वृत्तानुसार, श्रीमूक अंबिका इन्फोसोल्युशन ही कंपनी मदुरईमध्ये आहे. ही कंपनी कर्मचाऱ्यांना कथितरित्या मोफत मॅच मेकिंग सेवाही देते. अशा प्रकारच्या ऑफर दिल्यामुळे इतर कंपन्याच्या तुलनेत या कंपनीचे कर्मचारी नोकरी बदलण्याचा खूप कमी विचार करतात. नोकरी बदलण्याचा विचार आला की तोपर्यंत पगारवाढीचा कालावधी येतो. गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीतील कर्मचाऱ्यांचा नोकरी बदलण्याचा दर फक्त १० टक्के आहे. या समस्येतून जाणाऱ्या आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस आणि विप्रोसारख्या कंपन्यांपेक्षा हा दर खूपच कमी आहे.
या आयटी कंपनीत सध्या ७५० हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यापैकी ४० टक्के कर्मचारी गेल्या पाच वर्षांपासून कंपनीसोबत कायम आहेत. तामिळनाडूमधील शिवकाशी शहरात २००६ मध्ये कंपनीची स्थापन झाली होती. त्यानंतर कंपनीचा विस्तार झाला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या ऑफर देण्यास सुरुवात केली. २०१० साली कंपनीने आपले मुख्यालय मदुराई येथे स्थलांतरित केले.
कंपनीच्या संबंधित प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, कंपनीत काम करताना एखाद्या कर्मचाऱ्याचा विवाह झाला, तर त्याला वेतनवाढ दिली जाईल, ही ऑफर कंपनीने सुरुवातीपासूनच दिली होती. त्याशिवाय कंपनीच्या वेतनवाढीच्या नियमानुसार, सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेळी सहा ते आठ टक्क्यांची वेतनवाढ दिली जाते.
गेल्या आर्थिक वर्षात जेव्हा नोकरी सोडण्याचा दर उच्चपातळीवर पोहोचला होता, तेव्हा कंपनीने
कर्मचाऱ्यांना दुप्पट पगाराची ऑफर देत कर्मचाऱ्यांना दुसरीकडे जाऊ दिले नाही. एसएमआयचे संस्थापक खासदार सेल्वगणेश सांगतात, आमच्यासोबत काही कर्मचारी दीर्घकाळापासून काम करत आहेत. त्यांच्या मनात नोकरी बदलण्याचा विचार येण्यापूर्वीच आम्ही योग्य ती पावले उचलत असतो.